ईदच्या दिवशी मुंब्य्रातून दोन मुली बेपत्ता 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

मुंब्रा, अमृतनगर येथे खेळणी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या उल्हासनगर येथील व्यापाऱ्याच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलींचे अज्ञात आरोपीने फूस लावून अपहरण केल्याची तक्रार व्यापाऱ्याने मुंब्रा पोलिस ठाण्यात केली आहे.

ठाणे : ईद-ए-मिलादच्या दिवशी मुंब्य्रातून दोन अल्पवयीन मुली घरातून गायब झाल्याचे समोर आले आहे. मुंब्रा, अमृतनगर येथे खेळणी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या उल्हासनगर येथील व्यापाऱ्याच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलींचे अज्ञात आरोपीने फूस लावून अपहरण केल्याची तक्रार व्यापाऱ्याने मुंब्रा पोलिस ठाण्यात केली आहे.

दिनेश कुवरिया असे व्यापाऱ्याचे नाव असून ईदनिमित्त मुंब्य्रात त्यांनी खेळण्यांचा स्टॉल लावला होता. खेळणी विक्रीसाठी दिनेश यांची पत्नीदेखील सोबत आली होती. दुपारच्या सुमारास दिनेश यांच्या मेव्हणीसोबत 15 वर्षीय मुलगी सोनल ही देखील मुंब्य्रात आली होती. ईदच्या दिवशी मुंब्य्रात तोबा गर्दी असल्याने सोनल गायब झाली.

सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने अखेर दिनेश यांनी अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुंब्रा पोलिसांत केली आहे. दरम्यान, ईदच्या दिवशीच मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास जमीला शेख यांची 16 वर्षीय मुलगी इमारतीखाली जाऊन येते सांगून गेली. तेव्हापासून अद्यापपर्यंत ती घरी आली नाही, अशी तक्रार जमीला यांनी मुंब्रा पोलिसांत केली आहे. 
 

web title : Two girls missing on Eid from mumbra

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two girls missing on Eid from mumbra