ट्रान्स हार्बरवर रुळाला तडे दोन तास वाहतूक ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

ओव्हरहेड वायर तुटल्याचे निमित्त होऊन ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा तब्बल तीन तासांहून अधिक काळ ठप्प होण्याला आठवडा उलटत नाही तोपर्यंतच बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ऐरोली ते ठाणे या दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले. यामुळे या मार्गावरील लोकल सेवा पुन्हा दोन तास ठप्प झाली. रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील रेल्वे रुळांची दुरुस्ती केल्यानंतर 5 वाजण्याच्या सुमारास लोकल सेवा सुरू झाली; मात्र यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

नवी मुंबई : ओव्हरहेड वायर तुटल्याचे निमित्त होऊन ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा तब्बल तीन तासांहून अधिक काळ ठप्प होण्याला आठवडा उलटत नाही तोपर्यंतच बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ऐरोली ते ठाणे या दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले. यामुळे या मार्गावरील लोकल सेवा पुन्हा दोन तास ठप्प झाली. रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील रेल्वे रुळांची दुरुस्ती केल्यानंतर 5 वाजण्याच्या सुमारास लोकल सेवा सुरू झाली; मात्र यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. 

बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास ट्रान्स हार्बर मार्गावरून मालगाडी जात होती. या वेळी मालगाडी घेऊन जाणाऱ्या चालकाला तेथे रेल्वे रुळाला तडा गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्याने कळवा येथे मालगाडी उभी केली. त्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील दोन्ही बाजूच्या गाड्या थांबून राहिल्या. याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाला समजल्यानंतर त्यांनी तातडीने या ठिकाणी जाऊन मालगाडी बाजूला करून रेल्वे रुळाची दुरुस्ती केली. त्यानंतर सांयकाळी 5 च्या सुमारास या मार्गावरून लोकल सेवा सुरू केली. या प्रकारामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा तब्बल 2 तास बंद राहिल्याने या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. अनेकांनी एसटी, एनएमएमटी तसेच इतर खासगी वाहनांचा आधार घेऊन आपले ठिकाण गाठण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे रेल्वे प्रशासनाने मध्य व हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती; मात्र या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला. 

Web Title: two hours Traffic harassment on Trans Harbor line