‘क्रिप्टझो’तील स्फोटात दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

कंपनी प्रशासनावर कारवाईची मागणी; मृतदेह नातेवाईकांनी घेतले ताब्यात

अलिबाग : माणगावमधील विळे-भागाड एमआयडीसीतील क्रिप्टझो कंपनीत शुक्रवारी झालेल्या स्फोटात दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला; तर १६ जण नवी मुंबईतील नॅशनल बर्न सेंटर येथे मृत्यूशी झुंज देत आहेत. कारवाईच्या आश्‍वासनानंतर नातेवाईकांनी शनिवारी (ता. १६) सायंकाळी मृतदेह ताब्यात घेतले. या दुर्घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

आशिष येरुणकर (रा. म्हशेवाडी), राकेश हळदे (रा. उंबर्डी निजामपूर) अशी होरपळून मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांचे मृतदेह रात्री १०.३० वाजेपर्यंत निजामपूर येथे पोहचणार आहेत. कायदा-सुव्यस्था बिघडू नये यासाठी पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे. शनिवारी झालेल्या पंचक्रोशीतील सभेत कंपनीच्या संचालकांबरोबरच कारखाना निरीक्षकांवरदेखील (फॅक्‍टरी इन्स्पेक्‍टर) गुन्हे दाखल करावेत; अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.

फॅक्‍टरी निरीक्षकांचा अहवाल घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृतांचे नातेवाईक मुंबईतून आल्यानंतर प्रशासनाबरोबर चर्चा होऊ शकते, चर्चेसंदर्भात कोणतीही कल्पना दिलेली नाही.
- अनिल पारस्कर,
जिल्हा पोलिस अधीक्षक, रायगड

भरपाई मिळण्यासंदर्भात तडजोड नातेवाईकांना मान्य नाही. बैठकीत ५० लाख रुपये मृतांना आणि ३० लाख जखमींना भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. उद्या मालकाबरोबर प्रांत कार्यालायात बैठक होणार आहे.
- जनार्दन मानकर,
ग्रामस्थ, निजामपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two killed in 'cryptozo' blast