लेडीज स्पेशल, पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी

पूजा विचारे
Sunday, 27 September 2020

अत्यावश्यक सेवेमध्ये प्रवास करणाऱ्या पश्चिम रेल्वेवरील महिला प्रवाशांसाठी रेल्वेनं सकाळी आणि संध्याकाळी पिक अवरमध्ये लेडीच स्पेशन ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईः पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी. अत्यावश्यक सेवेमध्ये प्रवास करणाऱ्या पश्चिम रेल्वेवरील महिला प्रवाशांसाठी रेल्वेनं सकाळी आणि संध्याकाळी पिक अवरमध्ये लेडीच स्पेशन ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या मोठ्या संख्येमुळं लोकलमध्ये गर्दी होताना दिसत आहे. तसे काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. यावर उपाय म्हणून पश्चिम रेल्वेनं एक पाऊल टाकलं आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे गर्दीतून जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसंच लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच लेडीज स्पेशल लोकल मुंबईमध्ये चालवली जाणार आहे.

सोमवारपासून सहा फेऱ्यांची वाढ पश्चिम रेल्वेने केली आहे.  चर्चगेट ते विरार दरम्यान अत्यावश्यक महिला विशेष लोकल सुरु करण्यात येणार आहेत. सोमवार २८ सप्टेंबरपासून या लोकल फेऱ्या सुरू होतील. विरार- चर्चगेटसाठी सकाळी ७. ३५ची लोकल रवाना होणार आहे. तर, संध्याकाळी ६.१० वाजता चर्चगेट- विरार लोकल रवाना होणार आहे. या सर्व फेऱ्या धीम्या मार्गावरून धावतील. चर्चगेट ते विरार या स्थानकांच्या दरम्यान चालवण्यात येणार आहेत. याच सहा लोकल पैकी दोन लोकल या लेडीज स्पेशल लोकल असणार आहेत. 

काही दिवसांपूर्वीच पश्चिम रेल्वेने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या लोकलसेवेमध्ये वाढ करून, ३५० ऐवजी ५०० फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टनसिंग पाळले जावे आणि लोकलमध्ये गर्दी होऊ नये या होऊ नये या हेतूने विशेष लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक प्रवर्गातील कर्मचारी वगळता इतर प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश नसेल. त्यामुळे अन्य कोणीही रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये, अशी विनंती पुन्हा एकदा रेल्वेने केली आहे. तसंच  लोकलबाबत काही अफवा पसरवल्या जात असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Two Ladies Special train essential staff western railway after 6 months monday


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Ladies Special train essential staff western railway after 6 months monday