हम जहाँ रहते हैं, घर वहीं बन जाता है!

हम जहाँ रहते हैं, घर वहीं बन जाता है!

मुंबई - कुणालाही उपाशी मरू देत नाही ती मुंबई... ते खरेच; पण इथे डोईवर छप्पर लाभेलच याची कोणतीही गॅरंटी नाही. म्हणून मग मिळेल तिथे झोपड्यांचे आसरे तयार केलेल्यांचे संसार कोणत्या ना कोणत्या प्रकल्पामुळे उघड्यावर येतात. पण, म्हणून काही जगणे थांबत नाही! सांताक्रूझ-कलिनाच्या उड्डाणपूल प्रकल्पाने उघड्यावर आलेल्या दोन मेकॅनिक भावांनी भाड्यानेही घर मिळेना म्हणून चक्क दुरुस्तीसाठी आलेल्या चारचाकी वाहनालाच आपले ‘स्वीटहोम’ बनविले आहे!  

ही कहाणी आहे झोपडपट्टीत भाड्याच्या दुकानात गॅरेज थाटलेल्या बहाद्दर भावांची. हेच त्यांचे दुकान आणि मकानही होते. कलिनातील न्याय सहायक वैधानिक प्रयोगशाळेसमोर आणि विद्यापीठाच्या संरक्षक भिंतीलगत २० वर्षांपासून झोपड्या उभ्या होत्या. जानेवारीत गॅरेजवर पालिकेचा बुलडोझर फिरला. सांताक्रूझ-चुन्नाभट्टी उड्डाणपूल प्रकल्पासाठी हटवलेल्या झोपडीधारकांना माहूलमध्ये घरे दिली आहेत. ३०५ पैकी काही झोपडीधारकांना विविध कारणांमुळे घरे मिळाली नसल्याने ते त्याच ठिकाणी हलाखीत दिवस काढीत आहेत. बिहारहून २००० मध्ये मुंबईत आलेल्या गुप्ता नावाच्या तरुणाने त्याच झोपडपट्टीत भाड्याने चारचाकींचे गॅरेज सुरू केले. दुकानाचे नावही ‘गुप्ता’ होते. जम बसल्याने गुप्ताने आपल्या भावाला गावाहून मुंबईत बोलवले. अशोक आणि गुप्ता (गुप्ता नावानेच ओळख!) व्यवसाय करून त्याच दुकानामध्ये राहत होते. त्यांनी भाड्याच्या घरासाठी हयात हॉटेलशेजारील कृष्णा नगर झोपडपट्टीत अनेकांकडे चौकशी केली; पण आजवर घर मिळू शकले नाही. घरामध्ये काय किंवा गाडीत काय, आम्ही आनंदाने राहत असल्याचे अशोक गुप्ता याने सांगितले. 

रोटी और मकान 
सकाळी अशोक नगरमधील झोपडपट्टीत नळावर आंघोळ आटोपली की दोघे भाऊ गाडीतच जेवण बनवतात. गाडीत लाईट-फॅनची सोय आहे. गाडीतील सीट काढून प्लाय ठेवल्याने मोठी जागा झाली. हीच त्यांची बेडरूम! त्यांच्याकडे अशा आणखी दोन गाड्या आहेत. त्यांच्या गॅरेजची अनेकांना माहिती आहेच; शिवाय रस्त्याच्या कडेला बोर्डवर मोबाईल नंबर दिल्याने फोनही येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com