सिगारेटच्या वादातून, प्राणघातक हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

सिगारेट टॅक्‍सीवर घासून विझवल्याबाबत जाब विचारल्याच्या रागातून दोघांनी खासगी टॅक्‍सीचालकाच्या डोक्यात बाटली फोडली.

मुंबई : सिगारेट टॅक्‍सीवर घासून विझवल्याबाबत जाब विचारल्याच्या रागातून दोघांनी खासगी टॅक्‍सीचालकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार चेंबूर येथे घडला. संतापलेल्या संशयितांनी चालकाच्या डोक्‍यावर बिअरची बाटली फोडली. आरपीएफ पोलिसांनी नुकतीच त्या दोघांना अटक केली. 

नरेंद्र ऊर्फ टकल्या शिंदे (वय 19) आणि अशोक जाधव (21) अशी संशयितांची नावे आहेत. प्रवीण पंडागळे (32) असे तक्रारदाराचे नाव असून तो चेंबूर वाशी नाका येथे वास्तव्याला आहे. तो त्याच्या भावाची खासगी टॅक्‍सी चालवून उदरनिर्वाह करतो. सर्व भाडी पूर्ण करून पंडागळे घरी जाण्याच्या तयारीत होता.

चेंबूर परिसरात आरसीएफ गेट क्रमांक एकजवळ चहा पिण्यासाठी त्याने टॅक्‍सी थांबवली. त्या वेळी शिंदे याने टॅक्‍सीच्या काचेवर सिगारेट घासून विझवली. प्रवीणने याबाबत शिंदेला त्याचा जाब विचारला. त्या वेळी शिंदे आणि जाधव यांनी प्रवीणला मारहाण केली. त्यांनी त्याच्या डोक्‍यावर बिअरची बाटली फोडल्याने प्रवीण गंभीर जखमी झाला. प्रवीणच्या तक्रारीनुसार आरसीएफ पोलिसांनी दोघांना अटक केली.  

web title : two men assaulted taxi driver due to cigrate


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two men assaulted taxi driver due to cigrate