घाटकोपरची स्थानकाची कोंडी फुटणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

रेल्वेस्थानकात एक डेक, दोन नवीन पुलांची भर
 

मुंबई : मेट्रोमुळे प्रचंड गर्दीचा भार वाहणाऱ्या घाटकोपर स्थानकातील फलाट क्रमांक १ वर एक डेक, दोन नवीन पादचारी पूल व स्कायवॉकची भर पडणार आहे. त्यामुळे दोन वर्षांमध्ये येथील प्रवाशांना आता मोकळा श्‍वास घेता येईल. 

घाटकोपर स्थानकातील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) आणि मध्य रेल्वे प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. तसा प्रस्ताव ‘एमआरव्हीसी’ने मध्य रेल्वेला पाठवला असून, दोन वर्षांत ही कामे पूर्ण होणार असल्याने गर्दीचे व्यवस्थापन करणे शक्‍य होणार आहे.

‘मेट्रो’मुळे घाटकोपर स्थानकातील प्रवासी संख्या एक लाख ९० हजार ४५८ वर पोहोचली आहे. सकाळी व संध्याकाळी ‘पीक अवर’मध्ये घाटकोपर स्थानकातून प्रवास करणे प्रवाशांना जिकिरीचे होत आहे. त्यामुळे घाटकोपर व अंधेरी या स्थानकांतील गर्दीवर उपाय शोधण्यासाठी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आराखडा तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी योजना राबवण्यात येणार आहेत.

उपनगरीय रेल्वेमार्गावरील स्थानकांच्या पुनर्विकासासाठी एमयूटीपी-३ ए अंतर्गत ९५० कोटींच्या प्रकल्पानुसार अन्य १९ स्थानकांबरोबर घाटकोपरचा कायापालट केला जाईल, अशी माहिती ‘एमआरव्हीसी’तील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तसेच हे काम सुरू झाल्यापासून १८ महिन्यांत पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two new bridges and skywalk will be build in Ghatkopar railway Station