दोघा चोरट्यांना मुद्देमालासह अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

नवी मुंबई - खारघर सेक्‍टर-15 मधील गुडविल पॅराडाईज इमारतीत चोरी करण्यासाठी घुसलेल्या दोघा सराईत चोरट्यांना खारघर पोलिसांनी मंगळवारी पहाटे अटक केली. समीर फाजले इलाई खान (33) आणि सोलोमन डेव्हीड (20) अशी या चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी या चोरट्यांजवळ असलेले घरफोडीचे साहित्य, त्याचप्रमाणे त्यांनी सदर इमारतीतील फ्लॅटमधून चोरलेल्या वस्तू हस्तगत केल्या आहेत. या चोरट्यांकडून घरफोडीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. 

या प्रकरणात अटक करण्यात आलेले समीर आणि सोलोमन हे दोघे चोरटे मंगळवारी पहाटेच्या सुमारास खारघर सेक्‍टर-15 मधील गुडविल पॅराडाईज इमारतीत घुसले होते. रंगकाम करण्यासाठी सदर इमारतीला परांची बांधण्यात आल्याने त्याच्या साह्याने चोरट्यांनी इमारतीत प्रवेश केला होता. या वेळी दोघांनी त्या इमारतीतील पाच-सहा फ्लॅटमध्ये चोरी केली. त्यानंतर ते सातव्या मजल्यावर गेले असताना, घरामध्ये चोरटे शिरल्याचे सतीश तोतावार यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती खारघर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

या वेळी पोलिस चोरट्यांना पकडण्यासाठी सातव्या मजल्यावर पोहोचले असता, दोघा चोरट्यांनी इमारतीभोवती असलेल्या परांचीच्या साह्याने दोन-तीन मजले, खाली-वर करून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अखेर त्यांना पकडले. या वेळी दोघांच्या तपासणीत त्यांच्याजवळ घरफोडी करण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. तसेच त्यांनी त्या इमारतीतील वेगवेगळ्या फ्लॅटमधून चोरलेले मोबाईल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम व इतर वस्तूदेखील पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केल्या. पोलिसांनी या दोघांना अटक केली. 

या दोघांनी सदर इमारतीतील पाच ते सहा फ्लॅटमध्ये चोरी केली असण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. हे दोघे चोरटे सराईत असून यातील समीर फाजले इलाई खान हा दोन महिन्यांपूर्वीच शिक्षा भोगून बाहेर आल्याचे पोलिस उपनिरीक्षक थारकर यांनी सांगितले. न्यायालयाने या दोघांना 12 मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. 

Web Title: Two thieves arrested