दोन हजार हेक्‍टर भातशेती पाण्याखाली

सकाळ वृत्‍तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

पाताळगंगा नदीला पुर; दिघाटी-केळवणे मार्गावरील वाहतूक ठप्प

मुंबई : उरण तालुक्‍यात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने तालुक्‍यातील दोन हजार ३०० हेक्‍टर भातशेती पाण्याखाली गेली आहे. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत; मात्र समुद्राला मोठी भरती नसल्याने उरण तालुक्‍यात होणारी मोठी हानी टळली. पाताळगंगा नदी ओसंडून वाहू लागल्याने साई- दिघाटी- केलवणेचा रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्याचा फटका या परिसरातील वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना बसला असून त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

पाताळगंगा नदी ओसंडून वाहू लागल्याने दिघाटी- साई- केळवणे हा रस्ता पाण्याखाली गेला असल्याने नवी मुंबई, उरण शहराकडून पेण, अलिबाग, रसायनीकडे ये-जा करणारे वाहनचालक, प्रवासी, चाकरमान्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. तसेच काही वृक्ष विद्युत तारेवर पडल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला.

 तीन दिवस होणाऱ्या अतिवृष्टीमुळे २६ जुलैची पुनरावृत्ती जसखार, रांजणपाडा, कुंडेगाव, सोनारी, करल, पागोटे, खोपटा, चिरनेरसह उरण तालुक्‍यातील इतर गावांत न झाल्याने रहिवाशांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

तालुक्‍यात पाऊस अधिक प्रमाणात पडला. वादळाने एका छोट्याशा घराचे नुकसान झाले. झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर पडून थोडे नुकसान झाले आहे.
- नरेश पेढवी, नायब तहसीलदार

मुसळधार पावसामुळे खाडीलगतची संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. पीक सतत पाण्याखाली असल्यामुळे काही वाचेल याचीही शक्‍यता नाही.
-चंद्रकांत तांडेल, शेतकरी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two thousand hectares of paddy under irrigation water