सिद्धिविनायक चरणी "गुलाबी' वर्षाव 

सिद्धिविनायक चरणी "गुलाबी' वर्षाव 

मुंबई - मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायक महागणपतीसमोर भक्तगणांनी आठवड्याभरात बाद झालेल्या पाचशे व हजारच्या नोटांबरोबरच कोऱ्या करकरीत गुलाबी रंगाच्या दोन हजाराच्या नोटांचाही वर्षाव केला आहे. नेहमीच्या इतर लहान-मोठ्या नोटांबरोबर परकीय चलन आणि धनादेश यांचाही पाऊस दानपेटीत पडला आहे. अनेकांनी शुभशकुन म्हणून मिळालेली पहिली दोन हजाराची नोट सिद्धिविनायकचरणी दान केली. 

गेल्या आठवड्यात मोठ्या नोटा रद्द झाल्याची संधी साधून अनेक भक्तांनी अशा प्रकारे आपल्या भक्तीचे दर्शन घडवले. सामान्यतः सिद्धिविनायकासमोरील दानपेट्या आठवड्यातून दोनदा उघडल्या जातात. गेल्या आठवड्यात मोठ्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी दानपेट्या उघडण्यात आल्या. त्यामुळे भक्तगणांच्या दानावर त्या निर्णयाचा काय परिणाम झाला हे तेव्हा समजू शकले नाही. 

दानपेटीतील रकमेबाबत मंदिर न्यास व बॅंक यांची पूर्वीपासूनच व्यवस्था ठरलेली आहे. दानाच्या पैशांनी पेट्या भरल्या की त्या सीलबंद केल्या जातात. बॅंक कर्मचारीच मंदिरात येऊन सर्वांसमक्ष दानपेट्या उघडतात व रक्कम मोजून नोंदी करतात. मंदिर न्यासाची खाती अनेक बॅंकांमध्ये असून जमा झालेल्या रकमेचे वाटप सर्व बॅंकांमध्ये केले जाते. त्यानुसार मुदत ठेवी केल्या जातात. सोमवारी बॅंकांना रजा असल्याने दानपेट्या उघडण्यात आल्या नाहीत. त्या थेट आजच उघडण्यात आल्या. चौथ्या मजल्यावरील कक्षात बॅंक कर्मचारी व मंदिर न्यासाचे कर्मचारी दिवसभर रक्कम मोजत होते. सकाळी 8 वाजता सुरू झालेले काम संपण्यास रात्रीचे 8 वाजले. 12 तास अविरत पैसे मोजले जात होते. 

डॉलर, पौंड, युरो अन्‌ धनादेशाद्वारेही दान 

दानपेट्यांमध्ये पाचशे-हजारच्या रद्द झालेल्या नोटा मोठ्या प्रमाणात होत्या. विशेष म्हणजे दोन हजारांच्या नोटाही सढळ हस्ते दान करण्यात आल्या होत्या. सर्व लहान-मोठ्या नोटा आणि नाणीही त्यात होती. त्याचबरोबर काहींनी डॉलर, पौंड, युरो आणि अरबी दिऱ्हॅमबरोबर धनादेशही दानपेट्यांमध्ये टाकले होते. सर्व नोटा वेगवेगळ्या लावून त्यांचे गठ्ठे करून यंत्रांद्वारे त्या मोजण्यात आल्या. त्यासाठी चार यंत्रे आणली गेली होती. मंदिरातर्फे रद्द झालेल्या नोटा अधिकृतरीत्या स्वीकारल्या जात नाहीत; परंतु अनेकांनी पावती घेऊन रक्कम दान करण्यापेक्षा थेट दानपेटीत नोटा टाकल्याने त्यांचा स्वीकार करावा लागला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com