वर्षभरात एक हजार 575 दुचाकींची चोरी

मंगेश सौंदाळकर
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

मुंबई - मुंबईमध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांत तब्बल एक हजार 575 दुचाकी, तर 533 वाहने चोरीला गेल्याची नोंद आहे. यातील बहुतांश वाहनांची चोरी मौजेसाठी केल्याचे तपासात उघड झाले आहे. दुचाकी व वाहने चोरी होण्याचे प्रमाण पश्‍चिम उपनगरात अधिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मुंबई - मुंबईमध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांत तब्बल एक हजार 575 दुचाकी, तर 533 वाहने चोरीला गेल्याची नोंद आहे. यातील बहुतांश वाहनांची चोरी मौजेसाठी केल्याचे तपासात उघड झाले आहे. दुचाकी व वाहने चोरी होण्याचे प्रमाण पश्‍चिम उपनगरात अधिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मुंबईत दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढल्याने सोसायट्यांच्या आवारात वाहने उभी करण्यास जागा नसते. पर्यायाने अनेकांना वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात. याचाच फायदा चोरटे घेतात. मुंबईत 11 महिन्यांत एक हजार 575 दुचाकी चोरीला गेल्याची नोंद आहे. बोरीवली, कांदिवली, अंधेरी, एमएचबी कॉलनी, चारकोप, दहिसर, मालाड या परिसरातून अधिक दुचाकी चोरीला गेल्याची नोंद आहे. मध्यरात्री दोन ते चार वाजेपर्यंत वाहने चोरी होतात. दुचाकीचे लॉक तोडणे सहज शक्‍य असते. लॉक तोडून चोरटे दुचाकी घेऊन पसार होतात. काहीजण मौजेसाठी दुचाकी चोरत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. रात्रभर दुचाकी फिरवून पेट्रोल संपल्यावर तेथेच सोडलेल्या काही दुचाकी पोलिसांनी बेवारस म्हणून जप्त केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी खेरवाडी पोलिसांनी एका दुचाकी चोराला अटक केली होती. त्याने मौजेसाठी सहा दुचाकी चोरल्याचे तपासात कबुली दिली.

नाकाबंदीवेळी ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्यांना पकडल्यानंतर ते कागदपत्रे घरी असल्याचे सांगून पळ काढतात. वाहतूक पोलिसांनी टोविंग केलेल्या दुचाकी हरवल्याची तक्रार चालक करतात. दुचाकी मिळाल्यानंतर तक्रारदार पोलिस ठाण्यात माहिती देण्यासाठी येत नाहीत. वाहन चोरी होऊ नये यासाठी उपाययोजना करावी, त्यासाठी पोलिसांनी एक पत्रक तयार केले आहे.

चोरीच्या बुलेटला मागणी
सध्या बुलेटला प्रचंड मागणी असल्याने चोरांचा बुलेट चोरण्याकडे अधिक कल आहे. ऍक्‍टिवा दुचाकीचे प्रमाणही वाढत आहे. स्कॉपिओ, तवेरा, इनोव्हा ही वाहनेही मोठ्या प्रमाणात चोरीला जातात. पूर्वी मुंबईतील चोरीची वाहने गुजरातला नेली जात असत. गुजरात पोलिसांना चोरीची वाहने ओळखण्याचे प्रशिक्षण दिल्याने हे प्रमाण कमी झाले.

आकडेवारी
वर्षे वाहन चोरी जप्त केलेली वाहने

2011 4,768 1,586
2012 4,089 1,279
2013 3,807 1,203
2014 3,494 1,825
(सदरची आकडेवारी मुंबई पोलिसांची आहे)

Web Title: Two wheelers stolen a thousand 575 a year