स्वाईन फ्लूमुळे मार्चमध्ये मुंबईत दोन महिलांचा मृत्यू 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 25 एप्रिल 2019

 मुंबईत मार्चमध्ये स्वाईन फ्लूमुळे दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.  या दोघी माझगाव आणि आग्रीपाडा येथील रहिवासी होत्या. 

मुंबई -  मुंबईत मार्चमध्ये स्वाईन फ्लूमुळे दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.  या दोघी माझगाव आणि आग्रीपाडा येथील रहिवासी होत्या. 

स्वाईन फ्लूचे निदान झाल्यामुळे 65 वर्षांच्या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार केले जात होते. त्यानंतर त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मधुमेह असल्यामुळे त्यांची प्रकृती आणखी बिघडली आणि उपचारादरम्यान दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली. स्वाईन फ्लू झाल्यामुळे 30 वर्षांच्या महिलेवर महापालिका रुग्णालयात आठवडाभर उपचार करण्यात आले; मात्र तिचाही मृत्यू झाला. आतापर्यंत मुंबईत 121 आणि राज्यात 1200 स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील रुग्णांची संख्या 89 आहे. देशभरात स्वाईन फ्लूचे 24 हजार रुग्ण आढळले असून, 791 मृत्यू झाले आहेत. 

दृष्टिक्षेपात 
- स्वाईन फ्लू हा आजार 2009 मध्ये जगभरात पसरला. प्रामुख्याने हिवाळा आणि पावसाळ्यात या आजाराची लागण होते. या आजाराला कारणीभूत असलेला "आरएनए' प्रकारचा विषाणू जनुकीयदृष्ट्या अत्यंत लवचिक असतो. 
- अती जोखमीच्या व्यक्ती : पाच वर्षांखालील मुले व 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, अस्थमा, हृदय-यकृत-मूत्रपिंडाचे विकार, रक्त किंवा चेतासंस्थेचे आजार असलेले रुग्ण, एचआयव्ही बाधित आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्ती, गरोदर स्त्रिया आणि स्थूल व्यक्ती. 
- या आजाराचे विषाणू हवेतून पसरतात; त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्‍यता असते. निरोगी व्यक्तीला आठवडाभरात या आजाराची बाधा होते. 
- लक्षणे : ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसादुखी, खोकला, थकवा, लहान मुलांमध्ये उलटी व जुलाब. 

प्रतिबंधात्मक उपाय 
- साबणाने व स्वच्छ पाण्याने हात धुवा. 
- आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा, भरपूर पाणी प्या. 
- इतरांशी हस्तांदोलन टाळा. 
- सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, धूम्रपान करू नका. 
- स्वाईन फ्लूसदृश लक्षणे असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा. 
(सौजन्य : आरोग्य विभाग, मुंबई महापालिका) 

Web Title: Two women died in Mumbai due to swine flu