लूटमार करणाऱ्या उबरचालकाला मुंब्र्यातून अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

संधी मिळताच घरात घुसून लूटमार करणाऱ्या उबरचालकाला रबाळे पोलिसांनी मुंब्रा परिसरातून अटक केली आहे. आरोपी एखाद्या घरात एकटी महिला असल्यास वेगवेगळे बहाणे करत घरात प्रवेश करत असे; त्यानंतर महिलेचे हातपाय बांधून लुटालूट करून पळून जात होता. 

नवी मुंबई : संधी मिळताच घरात घुसून लूटमार करणाऱ्या उबरचालकाला रबाळे पोलिसांनी मुंब्रा परिसरातून अटक केली आहे. आरोपी एखाद्या घरात एकटी महिला असल्यास वेगवेगळे बहाणे करत घरात प्रवेश करत असे; त्यानंतर महिलेचे हातपाय बांधून लुटालूट करून पळून जात होता. 

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कमलेश रामानंद गुप्ता (३० रा.मुंब्रा-दिवा) असे नाव असून तो उबेर प्रवासी कार चालवत होता. गत सोमवारी दुपारी घणसोली सेक्‍टर-९ मधील माथाडी कामगार सोसायटीत पाचव्या मजल्यावरील तोळाबाई जाधव यांच्या घरात प्लंबर म्हणून घुसून त्यांचे हात-पाय-तोंड बांधून घरातील सुमारे ७० हजार रुपये लुटून फरार झाला होता. आरोपीने गेल्या सप्टेंबर महिन्यात कोपरखैरणे सेक्‍टर-११ मध्ये अशाच पद्धतीने लूटमार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे हा लुटारू उबरची कार चालवून संधी मिळताच अशा प्रकारची लूट करत असल्याचे आढळून आले आहे. या लुटारूकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.  

गत सोमवारी दुपारीदेखील त्याने घणसोली सेक्‍टर-९ मधील माथाडी कामगारासांठी असलेल्या नव्या इमारतीत प्रवेश केला होता. या घटनेनंतर रबाळे पोलिसांनी अज्ञात लुटारू विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्या भागातील सीसी टीव्ही फुटेजची तपासणी केली होती. या वेळी आरोपी कमलेश गुप्ता हा कारमधून जाताना निदर्शनास आला.

त्यामुळे पोलिसांनी सदर कारच्या नंबरवरून आरोपीचा शोध घेत मुंब्रा परिसरातून त्याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने घणसोली व कोपरखैरणेमध्ये घरात घुसून दागिने लुटल्याची 
कबुली दिली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक महाजन यांनी दिली. न्यायालयाने या आरोपीला १८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावल्याचेही महाजन यांनी सांगितले.  

अशी करायचा घराची निवड...
उबेरच्या माध्यमातून प्रवासी कार चालवतानाच कमलेश गुप्ता हा ज्या परिसरात प्रवासी घेऊन जात होता, त्या परिसरातील एखाद्या सोसायटीत संधी साधून घुसत होता. त्यानंतर ज्या घरासमोर जास्त चप्पल आहेत, अशा घराऐवजी तो एकच चप्पलची जोड असलेल्या घराची निवड करत होता. त्यानंतर पाणी मागण्याच्या बहाण्याने अथवा प्लंबिंगचे काम आहे, अशी विविध कारणे सांगून घरात प्रवेश मिळवत होता. त्यानंतर संधी साधून घरात एकट्या असलेल्या महिलांचे तोंड-हात-पाय बांधून तो घरातील दागिने लुटून पळून जात असल्याचे तपासात आढळून आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uber driver arrested for robbery