
Uday Samant : डोंबिवलीत मध्यरात्री उदय सामंत यांची धाड...!
डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील 27 गावात पाण्याचा प्रश्न बिकट असून पाणी माफियांचे प्रस्थ या ठिकाणी जास्त आहे. या गावांना येत्या सात दिवसांत मुबलक पाणी पुरवठा व्हावा व पाणी चोरणाऱ्या टॅंकर लॉबीवर कठोर कारवाई व्हावी असे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एका बैठकीत दिले होते.
आदेश देऊन 24 तास उलटत नाही तोच उद्योगमंत्री सामंत यांनी स्वतः सोमवारी मध्यरात्री डोंबिवलीत धाड टाकली. पाण्याच्या पाईपलाईनला टॅप मारुन पाणी माफियांचा पाणी चोरण्याचा सुरु असलेला रात्रीचा खेळ पाहून खुद्द सामंत यांना आश्चर्य वाटले. चार ठिकाणी सामंत यांनी छापे मारत पाणी चोरी केंद्रे बंद केली, तसेच बेकायदा मिनरल वॉटर कंपनी देखील सिल करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवलीतील 27 गावातील पाण्याची समस्या ही जटील असून या ठिकाणी अमृत योजनेतून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतू तत्पूर्वी या भागातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
कल्याण लोकसभा मतदार संघातील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती. सोमवारी पार पडलेल्या बैठकीत सामंत यांनी एका आठवड्याच्या कालावधीत 27 गावातील नागरिकांना मुबलक पाणी देण्यात यावे.
असे न झाल्यास सर्व विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी सुचना सामंत यांनी प्रशासनास दिल्या होत्या. तसेच एमआयडीसी व पालिकेच्या पाईपलाईनमधून पाणी चोरणाऱ्या टॅंकर लॉबीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.
ग्रामीण भागात पाणी प्रश्न जटील असून पावसाळ्यातही नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी टंचाईची समस्या असल्यामुळे पाणी माफियांचे प्रस्थ या ठिकाणी वाढले आहे. एमआयडीसी, महापालिकेच्या मुख्य वाहिनीला टॅप करुन पाणी माफिया पाणी चोरुन ते पाणी टॅंकरच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकत आहेत.
दोन ते तीन हजार रुपये टॅंकर या दराने ही पाण्याची विक्री होत आहे. पालिकेकडून मोफत दिले जाणाऱ्या टॅंकरची संख्या ही कमी असून सर्वच भागात हे टॅंकर मोफत दिले जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना खासगी टॅंकरचा आधार घ्यावा लागतो. यामुळे टॅंकर माफिया देखील सक्रीय झाले आहेत.
काही टॅंकरचालक सोसायटी, चाळ यांना पाणी विकत देताना 450 रुपयांची पावती फाडतात आणि प्रत्यक्षात रहिवाशांकडून दोन ते तीन हजार रपये उकळले जातात. यामध्ये पालिका अधिकारी, टॅंकर चालकांचे साटेलोटे असून अधिकाऱ्याच्या आर्शिवादाने ही टॅंकर लॉबी सक्रिय असल्याचा आरोप यापूर्वी अनेकदा स्थानिक रहिवाश्यांनी केला आहे.
एमआयडीसीच्या पाईपलाईनवरुन पाणी चोरून वार्शिंग सेंटर काटई बदलापूर रोडला चालविले जात आहेत. येथील अनधिकृत बांधकामांना देखील याच वाहिनीवरुन चोरुन पाणी पुरवठा केला जातो. उघडउघड ही चोरी होत असताना त्यावर कठोर अशी कोणतीही कारवाई अद्याप पर्यंत झालेली नाही.
पाणी चोरुन ते बाटलीमध्ये सील पॅक करुन स्वच्छ पाणी म्हणून विकणाऱ्या काही कंपन्या देखील या भागात स्थापन झाल्या असून त्यांचा उघडउघड धंदा ग्रामीण भागासह शहरी भागात सुरु आहे. या कंपन्यांची कल्याण डोंबिवली महापालिका तसेच एमआयडीसी किंवा महसूल विभागाकडे कोणतीही नोंद नाही.
शीळ रस्त्यावरील अशाच एका बाटलीबंद पाणी विकणाऱ्या कंपनीवर महावितरणच्या ठाणे विभागातील अधिकाऱ्यांनी छापा मारुन वीज चोरीची घटना उघड केली होती. याठिकाणी पाणीही चोरुन वापरले जात होते, परंतू त्याविषयी काही माहिती उघड झाली नव्हती अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
ग्रामीण भागात पाणी टंचाईचे दुर्भिक्ष असून पाणी चोरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांना मिळाली होती. माहितीची खात्री केल्यानंतर तसेच बैठक पार पडून 24 तास उलटत नाही तोच उद्योगमंत्री सामंत यांनी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास डोंबिवली परिसरात अचानक धाड टाकली.
चार ठिकाणी ही धाड टाकण्यात आली त्यावेळी पालिका, एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीवरील पाणी टँकर चालक चोरुन काढत असल्याचे सामंत यांच्या निदर्शनास आले. चार ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या यामध्ये पालिकेचे पाणी चोरून अवैध मिनरल वॅाटरचा कारखाना उभारलेला असून या कंपनीत हजारो लिटरच्या अवैध टाक्या बांधल्या आल्या होत्या.
हा कारखाना सिल करुन टॅंकर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तात्काळ टँकर चालकांचे टँकर जप्त आणि बंदिस्त बाटलीबंद पाणी विकणारी कंपनी सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, प्रांत अभिजीत भांडे पाटील यांना सामंत यांनी दिले. त्यानुसार कंपनी सील करण्यात आली आहे. टॅंकर चालकांचे परवाने जागच्या जागी रद्द करण्यात आले आहेत.
तसेच टॅंकर लॉबीचे ऑडीट करण्याचे निर्देश सामंत यांनी यावेळी दिले. 27 गावांमधील नागरिकांना पाणीटंचाईमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी यापुढे पाणी चोरांवर वर्षभर नियमित कारवाई केली जाईल असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले