...तर मिशा काढीन, उदयनराजेंचे ओपन चॅलेंज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

ईव्हीएम मशिनमधे व्हायरस जात असेल तर संसेदतही व्हायरस घुसतायेत. मी प्रामाणिकपणे खरं बोलणारा खासदार आहे. माझं ओपन चॅलेंज आहे... मी खासदारकीचा राजीनामा देतो. मुख्य निवडणूक आयुक्तांना माझं चॅलेंज आहे.

मुंबई : ''ईव्हीएम मशिनमधे व्हायरस जात असेल तर संसेदतही व्हायरस घुसतायेत. मी प्रामाणिकपणे खरं बोलणारा खासदार आहे. माझं ओपन चॅलेंज आहे... मी खासदारकीचा राजीनामा देतो. मुख्य निवडणूक आयुक्तांना माझं चॅलेंज आहे. सातारा लोकसभेचं बॅलेटवर परत मतदान घ्या. मी माझ्या खर्चानं  निवडणुक करतो...नाय फरक पडला तर मिशा काढीन आणि भुवया पण भद्रवीन'' अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेंनी निवडणुक आयोगाला आव्हान दिले.

ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीत 376 पेक्षा अधिक मतदारसंघातील मतांमध्ये तफावत आढळून आल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामध्ये राज्यातदेखील अनेक पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. आता सातारा लोकसभेतून विजयी झालेले खासदार उदयनराजे भोसले यांनीही मतमोजणीतील फरकावरून पत्रकार परिषद घेत चौफेर टीका केली.

लोकसभा मतदारसंघात आपल्याला साडेतीन ते पावणेचार लाखांचे मताधिक्य आहे. मी राजीनामा देतो. पुन्हा फेरमतदान होऊ दे, तितक्याच मताधिक्कयाने निवडून येईन, असे म्हणत त्यांनी बॅलेट पेपरद्वारे फेरनिवडणूक घेण्याची तयारी आहे का? असा सवाल निवडणूक आयोगाला केला आहे. ईव्हीएम मशीनमुळे लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप उदयनराजे यांनी करत ही यंत्रणा म्हणजे देशाच्या व्यवस्थेला लागलेली कीड आहे, ती उखडून टाकायला हवी, असे वक्तव्य केले.

देशभरातील मतदारसंघांमध्ये ईव्हीएम मशीनमधील आकडेवारीत घोळ झाला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान आणि मतमोजणी यांच्यामध्ये फरक दिसून येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये गडबडी झाल्याचा आरोप करत मी आता राजीनामा देतो. या मतदारसंघात बॅलेट पेपरवर फेरमतदान घ्या, असे खुले आव्हान उदयनराजे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले.

सर्वोच्च न्यायालयाने अधिकाराने या विषयावर भाष्य करायला हवे; मात्र, या विषयावर दाद मागणार्‍यालाच कारवाईची भाषा वापरली जाते, आपण ईव्हीएम विरोधात न्यायालयात जाणार नसल्याचं सांगत हा विषय जनतेच्या न्यालायात जाऊन त्यावर चौफेर चर्चा झाली पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केले.

देशभरात अनेक मतदारसंघांत घोळ झाल्याचा संशय आहे.आयोगाने पोर्टलवरून आकडेवारी हटवल्याने संशय आणखीनच वाढला आहे.यामुळे या विषयावर गांभीर्याने चर्चा होणं गरजेचं असून निवडणुक आयोगानं  चॅलेंज स्वीकारून जनतेच्या शंकांचं निरसन करावं अन्यथा लोकंच या मशीन फोडतील,त्यांना कसं अडवणार असा सवाल ही उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: udayan raje gives open challenge to election commission