मोदींच्या अहंकाराला सरसंघचालकांची चपराक - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

काही जण स्वतःला देशाचे भाग्यविधाते समजत आहेत. 2014 मध्येच भारत जन्मला, इतरांचे वय वर्ष दोन असेच काहींना वाटते. चरखाही त्यांनीच आणला, याच एका माणसाने इंग्रजांविरुद्ध लढा देऊन त्यांना घालवले, सगळे त्यांनीच केले; परंतु ते फासावर गेले नाहीत, हे नशीब आणि आता तेच देश चालवत आहेत.

मुंबई - कोणीही दुसऱ्याची देशभक्ती मोजू नये, असे सुनावून सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकाराच्या कानफटात मारली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी गोरेगाव येथील प्रचार सभेत केली. 

ठाकरे यांनी मोदी यांची यथेच्छ खिल्ली उडवली. ते मोदींना उद्देशून म्हणाले, "काही जण स्वतःला देशाचे भाग्यविधाते समजत आहेत. 2014 मध्येच भारत जन्मला, इतरांचे वय वर्ष दोन असेच काहींना वाटते. चरखाही त्यांनीच आणला, याच एका माणसाने इंग्रजांविरुद्ध लढा देऊन त्यांना घालवले, सगळे त्यांनीच केले; परंतु ते फासावर गेले नाहीत, हे नशीब आणि आता तेच देश चालवत आहेत. अशा व्यक्तीच्या अहंकाराला भागवत यांनी कानफटात मारली आहे.' अशा खोटारड्या व्यक्तींना पाहून रजनीकांतही निवृत्त होईल, त्याचेही चित्रपट चालणार नाहीत, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. 

एकदा सर्जिकल स्ट्राइक करून पाहा, असा टोला आज फडणवीस यांनी ठाकरे यांना लगावला होता. त्यालाही उद्धव यांनी प्रत्युत्तर दिले. सर्जिकल स्ट्राइक करायला जणूकाही मुख्यमंत्री, अन्य लुंगेसुंगे आणि मोदी गेले होते. हल्ला केला जवानांनी आणि हे भाव खातात. भाजप सरकार जवानांची निकृष्ट अन्नाबाबतची तक्रार दूर करत नाही; पण त्यांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर मात्र आपल्या पोळ्या भाजून घेत आहे, अशी टीकाही उद्धव यांनी केली. मुख्यमंत्री एवढे हास्यास्पद बोलत आहेत, की त्याला पोरकटपणा असे संबोधून आपण मुलांचा अपमान करू इच्छित नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. नोटाबंदीचा फटका उद्धव ठाकरे यांना किती बसला, या मुख्यमंत्र्यांच्या प्रश्‍नालाही ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, नोटा बदलण्याच्या रांगेत 100 माणसे मृत्युमुखी पडली, याची लाज तुम्हाला वाटत नाही. निर्विकार मनाने कारभार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची मला लाज वाटते. असे निर्लज्ज सरकार आपण पाहिले नव्हते. नोटाबंदी करणाऱ्यांची भाजपबंदी करा आणि 21 तारखेला असा सर्जिकल स्ट्राइक करा, की 23 तारखेला यांचे डोळे पांढरे होतील, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. 

Web Title: Uddhav Thackeray criticize Narendra Modi