प्रधानांना भेटण्यास उद्धव यांचा नकार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

मुंबई - नाणार प्रकल्पासंबंधी चर्चा करण्यासाठी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेली भेटीची विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेटाळली आहे. करारानंतर भेट कसली मागता, अशी भूमिका शिवसेनेने घेतली असली, तरी भेटीची वेळ दोन ते तीन दिवसांपूर्वी मागितली होती, असे समजते. या प्रकल्पासंबंधी फेरविचार करणे शक्‍य नसल्याने वेगवेगळ्या माध्यमातून केली जाणारी भेटीची विनंती उद्धव यांनी फेटाळल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी ‘सकाळ’ला दिली. कोकणचे अरबस्तान करण्याचा भाजपचा प्रयत्न शिवसेना आणि कोकणवासीय अजिबात यशस्वी होऊ देणार नाहीत, असेही ते म्हणाले. 

मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत नाणार प्रकल्पासंबंधी झालेल्या कराराबद्दल शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्षेप नोंदविले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्प पुढे गेल्यास आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे या अगोदरच जाहीर केले आहे. भाजप आणि शिवसेनेत नाणार प्रकल्पावरून वाद वाढण्याची चिन्हे अधिकच गडद होत आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकारांशी बोलताना नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असून, तो कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. 

राऊत म्हणाले, की ‘सौदी आरामको’ या मूळ कंपनीतील ५० टक्‍के मालकीबाबत काल करार झाला. याचा अर्थ ही कंपनी स्वत:च्या बळावर हा प्रकल्प उभारू शकणार नाही. अणुप्रकल्पाबाबतही असेच झाले होते. ‘अरेवा’ कंपनीला त्या वेळी अन्य कंपन्यांच्या मदतीची गरज पडली आणि जैतापूर ठप्प झाले. मुळात कोकणात अशा प्रकारचे कोणतेही प्रकल्प सुरू करायला आमचा ठाम विरोध आहे. नाणार परिसरातील १४ गावांनी यासंबंधी नोंदविलेल्या विरोधाची कागदपत्रे उद्योग खात्याने मुख्यमंत्री कार्यालयाला रवाना केली आहेत. स्थानिकांचा विरोध असताना प्रकल्प होणे शक्‍य नाही. गिऱ्हे येथे सुमारे २० किलोमीटरपर्यंत या प्रकल्पाची पाइपलाइन जाणार आहे. तेथे ती समुद्रात सोडली जाईल. तेथे मासेमारीसाठी बंदर विकसित झाले आहे. प्रकल्पामुळे त्याचा ऱ्हास आम्ही होऊ देणार नाही.

Web Title: Uddhav Thackeray no meet Petroleum Minister Dharmendra Pradhan