उद्धव ठाकरे आज  पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर 

File Photo
File Photo

मुंबई : शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सत्तास्थापनेची चर्चा सुरू असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातारा-सांगली जिल्ह्यात ओला दुष्काळ पाहणी दौरा करणार आहेत. 15 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे हा दौरा करणार असून ते या वेळी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. पावसामुळे पिके वाहून गेली. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला. या दोन जिल्ह्यातील ओला दुष्काळाची पाहणी उद्धव ठाकरे करणार आहेत.

या वेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. सांगलीतील कडेगाव, नेवरी, विटा तर साताऱ्यातील मायणी, पुसेगाव, फलटण, लोणंद येथील शेतीची पाहणी करणार आहेत. त्यात आले, सोयाबीन, द्राक्षे, ज्वारी, बाजरी या पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी ते करतील. या वेळी त्यांच्यासोबत स्थानिक आमदारदेखील उपस्थित असतील. 

आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश 
आठवडाभर मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या शिवसेनेच्या आमदारांची बुधवारी मुक्तता करण्यात आली होती. या सर्व आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यास सांगण्यात आले होते; मात्र यानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांना तातडीने मुंबईत येण्यास सांगितले आहे.

17 नोव्हेंबर रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असल्याने त्यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी सर्व आमदारांना बोलावण्यात आल्याचे समजते. शिवसेनेच्या 45 आमदारांना सुरुवातीला वांद्रे येथील रंगशारदा हॉटेल आणि त्यानंतर त्यांना मालाडमधील दी रिट्रिट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. शिवसेना-भाजपमध्ये सत्तास्थापनेवरून संघर्ष सुरू असताना आपल्या आमदारांना प्रलोभन दाखवून कुणी फोडू नये, यासाठी शिवसेनेने ही काळजी घेतली होती; मात्र आता शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात महाशिवआघाडी स्थापन झाल्याने शिवसेनेवरील दडपण दूर झाले आहे.

आमदार वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन स्वत: उद्धव ठाकरे यांनी सत्ता आपलीच बनणार असल्याचे आत्मविश्वासाने सांगितले आहे. शिवाय महाशिवआघाडीने आपल्या किमान कार्यक्रमात शेतकऱ्यांचा प्रश्न अजेंड्यावर घेतल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न हातात घेण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्यातच उद्धव ठाकरेंनी सातारा-सांगलीमध्ये दौरा करण्याचा निर्णय घेतल्याने आमदारांनी ही आपापल्या मतदारसंघात लक्ष घालण्याचे निर्देश उद्धव ठाकरेंनी बुधवारी दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com