भाजपचं काय करायचं?; शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक

ब्रह्मदेव चट्टे
गुरुवार, 30 मार्च 2017

सत्तेत दाखल झाल्यापासून शिवसेना सतत सरकारवर टीका करत आहे. 'हे सरकार नालायक आहे,' असे सांगण्यापर्यंत शिवसेनेच्या नेत्यांची मजल गेल्याने भाजप आता वेगळा विचार करत असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. शिवसेनेच्या सततच्या विरोधाला कंटाळून भाजपने स्थिर सरकार बनविण्यासाठी मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

मुंबई : 'भारतीय जनता पक्षाबद्दल पक्षाची भूमिका काय असावी,' असा प्रश्‍न सध्या शिवसेनेच्या नेतृत्वाला पडलेला आहे. मध्यावधी निवडणुकीची शक्‍यता लक्षात घेता रणनीती ठरविण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार) सर्व प्रमुख नेत्यांची बैठक बोलाविली आहे. आज सायंकाळी 7.00 वाजता 'मातोश्री'वर ही बैठक होईल. 

सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना फोडून शिवसेनेशिवाय सरकार बनविण्याच्या भाजपच्या हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे 'राज्य सरकाररमधील शिवसेनेची भूमिका काय' यावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलाविली असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, शिवसेनेचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चाही जोरात सुरू आहेत. त्यामुळे 'आपल्याच आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न कसा करावा' याविषयीही या बैठकीत खलबते होणार असल्याचे समजते. 

सत्तेत दाखल झाल्यापासून शिवसेना सतत सरकारवर टीका करत आहे. 'हे सरकार नालायक आहे,' असे सांगण्यापर्यंत शिवसेनेच्या नेत्यांची मजल गेल्याने भाजप आता वेगळा विचार करत असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. शिवसेनेच्या सततच्या विरोधाला कंटाळून भाजपने स्थिर सरकार बनविण्यासाठी मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे संभाव्य राजकीय परिस्थितीत शिवसेनेच्या राजकीय भूमिकेबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

भाजपच्या दबाव तंत्राला बळी न पडता सरकारमधून बाहेर पडण्याची आग्रही मागणी शिवसेनेच्या काही आमदारांनी केली आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांमधील विसंवादावरही या बैठकीत तोडगा काढण्यात येणार आहे. शिवाय, राष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका काय असावी, याचीही चर्चा होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडे 25 हजार मतमूल्य आहे, तर भाजपला 20 हजार मतमूल्यांची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना भाजपला कोंडीत पकडू शकते. या सर्व बाबींचा विचार करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Uddhav Thackray calls important meeting of Shiv Sena leaders