उल्हास नदीच्या पुरास कारण की...

Ulhas-River-Flood
Ulhas-River-Flood

निसर्गाच्या कुशीतील घरांचे स्वप्न दाखवत अनेक विकासकांनी या उल्हास नदीच्या काठापर्यंत धोक्‍याची इमारत उभारून मृत्यूचे इमले बांधले आहेत. या वाढत्या शहरीकरणामुळे नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहांची केलेली अडवणूक पुराचे मुख्य कारण बनले.

मुंबई-ठाणे परिसरातील शहरांचा मुख्य जलस्रोत म्हणून उल्हास नदीकडे पाहिले जाते. वाढत्या शहरीकरणामुळे उल्हास नदीच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आणि नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहांची केलेली अडवणूक शनिवारी उल्हास नदीच्या महाप्रयलयंकारी पुराचे मुख्य कारण बनले. आधीच प्रदूषणग्रस्त या नदीच्या मुळावर आता येथील वाढते नागरीकरण घाव घालत असून, परिणामी भविष्यात याहून भयंकर महापुराला येथील नागरिकांना समोरे जावे लागण्याची भीती पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली.

मुंबई महानगर प्रदेशातील वेगाने होणाऱ्या महानगरांच्या भविष्यातील पाणी गरज भागवण्यासाठी उल्हास नदीच्या पाण्याचे व्यापक नियोजन करण्याची गरज होती; मात्र नियोजन दूरच, या नदीचे अस्तित्व नष्ट करण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मुसळधार पावसाचा इशारा देऊनही कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातून वाहणाऱ्या या नदीची पूररेषा अजूनही स्पष्ट नाही. त्यामुळे हिरव्यागार निसर्गाच्या कुशीतील घरांचे स्वप्न दाखवत अनेक विकासकांनी या नदीच्या काठापर्यंत धोक्‍याची इमारत उभारून मृत्यूचे इमले बांधले आहेत. त्यामुळे संततधार कोसळणाऱ्या पावसात कल्याण ग्रामीण तसेच बदलापुरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.

गेल्या चारपाच दिवसांपासून कल्याणपलीकडील अंबरनाथ, कर्जत आणि मुरबाड तालुक्‍यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने आपली धोक्‍याची पातळी शुक्रवारी रात्रीच ओलांडली होती. अंबरनाथ तालुक्‍यात गेल्या दोन दिवसांत २०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली; तर मुरबाड तालुक्‍यात तब्बल ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळला. त्यामुळे उल्हास नदीला पूर आल्याचे वनशक्ती संस्थेतील पर्यावरण अभ्यासक अश्विन अघोर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

उल्हास नदीकिनारच्या भागांना पुराचा फटका बसला असून, सखल भागांतही मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यात बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूरसारख्या भागांत बैठी घरे अक्षरश: पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे.

नागरीकरणामुळे उल्हास नदीच्या प्रवाहांवर परिणाम झाला असून, काही ठिकाणी नाल्यांचे मार्गही बदलले गेले आहेत. या सगळ्यांचा एकत्रित फटका आता बसू लागला आहे.

नाल्याचे नैसर्गिक प्रवाह रोखले...
वाढत्या शहरीकरणामुळे मोठमोठी गृहसंकुले उभारताना नदीच्या पाण्याचे, नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह वळवण्याचे दुःसाहस विकासकांनी केले आणि त्याचा दुष्परिणाम तेथे राहणाऱ्यांना भोगावा लागत असल्याचे बदलापूर येथील रहिवासी गणेश मसुरकर यांनी सांगितले. त्यामुळे अशा विकासकांवर कारवाई करून नैसर्गिक संसाधनाशी केला जाणारा खेळखंडोबा लवकरात लवकर थांबवून रहिवाशांची पूरसंकटातून मुक्तता करावी, अशी जनभावना आहे.

उल्हास नदीची उपयुक्तता...
उल्हास नदीच्या जल अभ्यासानुसार नदीखोऱ्यात ११ पाणलोट क्षेत्र आहेत. खोऱ्यामधील वापरण्यायोग्य भूजलसाठा १६३.६९ द.ल.घ.मी. असून सध्या त्यापैकी २७.४४ द.ल.घ.मी. पाणी वापरण्यात येते. सुमारे १३५.२५ द.ल.घ.मी. पाणी अजूनही वापरता येऊ शकते. खोऱ्यातील पाण्याची एकूण उपलब्धता ६७२१.२३४ द.ल.घ.मी. आहे. यामध्ये भूजलसाठ्यातील १६३ आणि वैतरणा खोऱ्यातील आयात १८२ द.ल.घ.मी. पाण्याचा समावेश आहे. लागवडीसाठी क्षेत्राच्या तुलनेत प्रतिहेक्‍टरी ४३९३.२७७ घ.मी. पाण्याची प्रतिमाणशी उपलब्धता १०३७.१७ घ.मी. आहे. आंतरराष्ट्रीय मानकानुसार प्रतिमाणशी १७०० घ.मी. हे प्रमाण समाधानकारक मानले जाते. त्यामुळे उल्हास नदीतील पाणी विपुल असले, तरी असमाधानकारक आहे हे स्पष्ट होते. उल्हास नदीकाठावर १७ तालुके, २ नगर परिषद, ६ महानगरपालिका, १ नगरपालिका व ८ ग्रामपंचायतींचा समावेश होतो. या भागातील सध्याची लोकसंख्या ६३.४९ लाखांच्या आसपास आहे. त्यांना या पाण्याचा वापर होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com