शिखरावरून पायथ्यावर

मयूरी चव्हाण - काकडे
गुरुवार, 19 जानेवारी 2017

महापालिका स्थापन होण्याआधी उल्हासनगर शहरात काँग्रेस पक्षाचा दबदबा होता. नगरपालिका अस्तित्वात असताना काँगेसची सत्ता, नगराध्यक्षही काँग्रेसचा आणि एकंदरीत जनमानसातही पक्षाचा बोलबाला होता. मात्र, एकेकाळी शहरावर अधिराज्य गाजवणाऱ्या काँग्रेसची आजघडीला वाताहत झाली आहे...

‘काँग्रेस का हाथ... आम आदमी के साथ’ असे बिरुद मिरवणाऱ्या पक्षात पप्पू कलानी यांनी प्रवेश करून  आमदारकीची पहिली निवडणूक लढवली आणि जिंकलीही. सिंधी समाजासह पंजाबी, उत्तर भारतीय, मराठी व इतर समाजांवर पक्षाची मजबूत पकड होती. शहरात सर्वत्रच हाताच्या पंजाची जादू होती. मात्र, महापालिका स्थापन झाल्यावर पक्षाला उतरती कळा लागली. त्यातून राष्ट्रवादी पक्षाचा उगम झाला. राष्ट्रवादीची स्थापना होण्यापूर्वी उल्हासनगरमध्ये काँग्रेसचे वर्चस्व होते. पप्पू कलानी यांनीही ‘पंजा’ची साथ सोडत मनगटावर ‘घड्याळ’ परिधान करण्यास पसंती दिली. त्यामुळे सिंधी मतांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये विभागणी झाली. त्याचा फटका काँग्रेसला बसला. उल्हासनगर शहराच्या राजकारणात एकेकाळी शिखरावर असलेला जुना पक्ष आज पायथ्यावर आला आहे.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसने लढविलेल्या ३३ जागांपैकी आठ जागांवर उमेदवार विजयी झाले. आठपैकी सात जागांवर सिंधी समाजाचे उमेदवार निवडून आले. त्यापूर्वी काँग्रेसच्या पाच जागा होत्या. आजघडीला आठपैकी दोन नगरसेविका व एका नगरसेवकाने राष्ट्रवादीत; तर दोन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उर्वरित नगरसेवकही इतर पक्षांच्या वाटेवर असल्याचे समजते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. 

आघाडीबाबत फक्त चर्चाच
काही सिंधी मतदार पूर्वीपासून काँग्रेसला मानणारा आहे. पक्षात स्थानिक पातळीवरही काही मराठी व इतर भाषक नेते असल्यामुळे त्याचा थोडाफार फायदा काँग्रेसला होऊ शकतो. राष्ट्रवादीसोबत आघाडी न झाल्यास काँग्रेस सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे समजते. वरिष्ठ पातळीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची उल्हासनगरमध्ये आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. दुसरीकडे साई पक्षासोबत हातमिळवणी करण्यासाठीही स्थानिक पातळीवर काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. २१ जानेवारीला निवडणुकासंदर्भात काँग्रेसच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतरच आघाडीबाबतचे चित्र स्पष्ट होईल.  

ज्येष्ठ नेत्यांच्या सभांसाठी साकडे
नारायण राणे, चंद्रकांत हंडोरे, अशोक चव्हाण, हुसेन दलवाई, भाई जगताप, नसीम खान, संजय निरुपम, कृपाशंकर सिंह आदी नेत्यांच्या प्रचारसभांसाठी स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांना साकडे घातले आहे. काँग्रेसचे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. जयराम लुल्ला, गटनेत्या जया साधवानी, अंजली साळवे, ‘स्वाभिमान’चे जिल्हा संघटक रोहित साळवे, हरदास मखिजा, अब्दुल रशीद पटेल, मालती करोतिया आदी स्थानिक पदाधिकाऱ्यांवर प्रचाराची भिस्त असेल.

प्रचारातील प्रमुख मुद्दे
धर्मनिरपेक्ष पक्ष, केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा विपरीत परिणाम, युतीने अनेकदा सत्ता उपभोगूनही विकासकामांचा उडालेला बोजवारा, रस्ते व पाणी समस्या, रखडलेले प्रकल्प आदी मुद्द्यांवर काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्‍यता आहे.

Web Title: Ulhashnagar municipal corporation