उल्हासनगरात शिवसेनेच्या पॅनलला स्वच्छतेचा प्रथम क्रमांकाच्या पुरस्कार प्रदान

दिनेश गोगी
रविवार, 22 जुलै 2018

फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर हे उल्हासनगरात असताना स्वच्छभारत सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. जो पॅनल या सर्वेक्षणात प्रथम येणार त्या पॅनलला पालिकेचे 50 आणि शासनाचे 30 असे 80 लाख विकास निधीच्या रूपात इनाम म्हणून दिले जाणार असे घोषित करण्यात आले होते.

उल्हासनगर - मागच्या महिन्यात स्वच्छ भारत सर्वेक्षणात अव्वल नंबर पटकावणाऱ्या शीवसेनेच्या पॅनल क्रमांक 10 च्या चारही नगरसेवकांना महापौर मिना आयलानी, आयुक्त गणेश पाटील यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पॅनलला 80 लाख रुपयांचा निधी विकासकामांसाठी दिला जाणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर हे उल्हासनगरात असताना स्वच्छभारत सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. जो पॅनल या सर्वेक्षणात प्रथम येणार त्या पॅनलला पालिकेचे 50 आणि शासनाचे 30 असे 80 लाख, दुसऱ्या पॅनलला पालिकेचे 30 व शासनाचे 20 असे 50 लाख आणि तिसऱ्या पॅनलला पालिकेचे 20 व शासनाचे 10 असे 30 लाख रुपये विकास निधीच्या रूपात इनाम म्हणून दिले जाणार असे घोषित करण्यात आले होते.
या सर्वेक्षणासाठी रमेश नानकानी, नंदकुमार चव्हाण, ज्योती तायडे, डॉ. राजू उत्तमानी, राजू तेलकर, अॅड. निकम यांची समिती गठीत करण्यात आली होती. समितीने एका पॅनलमध्ये असलेल्या चार वॉर्ड याप्रमाणे 78 वॉर्ड पिंजून काढले. कुठे स्वछता आणि कुठे अस्वच्छता याची फोटोग्राफी टिपली, चित्रीकरण करून संपुर्ण उल्हासनगरातील केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याकडे सोपवला होता.मात्र त्याचवेळी निंबाळकर यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी आयुक्तपदी आलेले गणेश पाटील हे एक महिन्याच्या ट्रेनिंगवर गेल्याने निकाल लांबणीवर पडत गेला होता.

27 जून रोजी मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे,एकनाथ पवार यांनी सर्वेक्षणाचा निकाल जाहीर केला होता. त्यात राजेंद्र चौधरी, राजश्री चौधरी, शुभांगी बेहनवाल, पुष्पा बागूल या शिवसेना नगरसेवकांच्या पॅनल 10 ला पहिला, राजेश वानखडे, अंजली साळवे, प्रमोद टाले, कविता बागूलयांच्या पॅनल 18 ला दुसरा आणि मीना सोंडे, विजय पाटील, किशोर वनवारी, मिनाक्षी पाटील यांच्या पॅनल 19 ने तिसरा क्रमांक जाहीर करण्यात आला होता. शुक्रवारी पार पडलेल्या महासभेत महापौर मिना आयलानी,आयुक्त गणेश पाटील यांच्या हस्ते पॅनल 10, 18, 19 च्या नगरसेवकांना प्रशस्तीपत्रा सोबत पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: In the Ulhasnagar city Shivsena panel will get the first cleanliness award