उल्हासनगरात मांडूळ जातीच्या सापांच्या तस्कारांना अटक

दिनेश गोगी
सोमवार, 19 मार्च 2018

दोन इसमांच्या पाठीवर कॉलेज विद्यार्थी विद्यार्थीनी वापरत असलेली बॅग होती. ते संशयास्पद रित्या इकडेतिकडे बघत असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या बॅगमध्ये दोन मांडूळ जातीचे अतिदुर्मिळ साप आढळून येताच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. 

उल्हासनगर - अति दुर्मिळ आणि माणसांच्या दुर्धर आजारावरील औषधासाठी व काळ्या जादूच्या उपयोगी असणाऱ्या मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा तस्कराला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती होती की, अंबरनाथ-बदलापूर मार्गावरील बंद पडलेल्या अहमद वूलन या कंपणीसमोर मांडूळ जातीच्या सापांच्या काही तस्कारांकरवी विक्रीचा सौदा केला जाणार आहे. ही खात्रीपूर्वक माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे, पोलिस निरीक्षक मनोहर पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्षद शेख, युवराज सालगुडे, श्रीकृष्ण नवले, उपनिरीक्षक गणेश तोरगल, हवालदार भरत नवले, संजय माळी, किशोर महाशब्दे, सुनील जाधव आदी पथकाने कंपनीच्या सभोवताली सापळा रचला. दोन इसमांच्या पाठीवर कॉलेज विद्यार्थी विद्यार्थीनी वापरत असलेली बॅग होती. ते संशयास्पद रित्या इकडेतिकडे बघत असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या बॅगमध्ये दोन मांडूळ जातीचे अतिदुर्मिळ साप आढळून येताच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. 

सुरेश निकम, चाळीसगाव व संजय पवार, पनवेल अशी या तस्करांची नावे असून त्याच्यावर भरत नवले यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39 (ड) सह कलम 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना 20 मार्च पर्यंत पोलीस कष्टडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हे साप कोणत्या वरण्यातून आणले, ते कुणाला किंबहूना मांत्रिकाला विकले जाणार होते. याची सखोल विचारपूस तस्कारांकडे केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.

Web Title: ulhasnagar mumbai snake smuggling arrested