अस्तित्वासाठी पाठबळाची गरज 

अस्तित्वासाठी पाठबळाची गरज 

उल्हासनगर शहरात पाणी, रस्ते, खड्डे, शिक्षण, अभ्यासिका आदी अनेक प्रश्‍नांवर मनसेने आंदोलने करून त्याचा पाठपुरावा केला; मात्र सिंधी समाजाची मोठी लोकसंख्या, मराठी मतांवर असलेली शिवसेनेची पकड आदी मुद्द्यांमुळे उल्हासनगर महापालिकेच्या दोन निवडणुकांमध्ये मनसेला फारसे यश मिळाले नाही. आजघडीला शहरात पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी मनसेला पाठबळाची गरज आहे... 

गेल्या निवडणुकीत मनसेचा एक उमेदवार निवडून आला. त्याअगोदर दोन जागांवरच मनसेला समाधान मानावे लागले होते; मात्र पक्षाचे एकमेव नगरसेवक नरेंद्र दवणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शहरात आज मनसे इंजिनाविनाच आहे. शहरातील मराठी अस्मितेचा मुद्दा शिवसेनेने पूर्वीच हायजॅक केल्यामुळे मनसेला त्याचा सर्वाधिक फटका बसला. भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीने केवळ मराठी मतदारांवर अवलंबून राहणे योग्य नाही, ही बाब लक्षात येताच स्थानिक पातळीवर सिंधी भाषिक कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याचा प्रयत्न मनसेने सुरू केला. 

यंदाच्या निवडणुकीत मनसे काही ठराविक जागा लढवणार आहे. इच्छुक उमेदवारांना अर्जवाटप करून त्यानंतर मुलाखती घेऊन किती जागा लढविणार ते निश्‍चित होईल. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. 

"टीम ओमी कलानी'सोबत युती? 
कॅम्प नंबर एक, चार आणि पाचमध्ये मराठीबहुल वस्ती असल्याने शिवसेनेच्या मतांची विभागणी करण्यासाठी मनसेच्या उमेदवारांना टीम ओमी कलानींचे पाठबळ लाभणार असल्याचे बोलले जात आहे. टीम ओमी कलानी यांच्याकडून युतीची ऑफर आली असल्याचे मनसेने अधिकृतपणे सांगितले आहे; मात्र पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या अंतिम आदेशानंतरच त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. 

प्रचारातील प्रमुख मुद्दे 
युतीच्या वचननाम्याचे पोस्टमार्टम, नाशिक शहरात मनसेने केलेले नवनिर्माण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, उल्हासनगर महापालिकेतील भ्रष्टाचार आणि लाचखोरी, एलबीटी घोटाळा, अवैध बांधकाम आदी मुद्द्यांभोवती प्रचार फिरणार आहे. 

राजू पाटील यांच्यावर प्रचाराची धुरा 
उल्हासनगर महापालिकेतील मनसेच्या प्रचाराची भिस्त सर्वतोपरी मनसेचे सरचिटणीस राजू (प्रमोद) रतन पाटील यांच्यावर अवलंबून आहे. ठाणे महापालिकेसह उल्हासनगर महापालिका निवडणुकीची मुख्य जबाबदारी राजू पाटील यांच्यावर आहे. त्यापाठोपाठ राजेश कदम, प्रकाश भोईर; तसेच स्थानिक पातळीवर शहर जिल्हाध्यक्ष (पूर्व) प्रदीप गोडसे, शहर जिल्हाध्यक्ष (पश्‍चिम) संजय घुगे, मनविसे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष बंडू देशमुख, मनविसे शहराध्यक्ष मनोज शेलार, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम आदींवर प्रचाराची धुरा असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com