उल्हासनगरमध्ये लाच देणाऱ्यालाच अधिकाऱ्यांनी दिले पकडून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

मिळकतीच्या मोजणीत येणाऱ्या लाखो रुपये बिलाच्या बदल्यात तडजोड म्हणून 50 हजार रुपयांची लाच देणाऱ्या व्यापाऱ्याला उल्हासनगर पालिकेचे करनिर्धार व संकलक युवराज भदाणे यांनी भ्रष्टाचारविरोधी पथकातील पोलिसांमार्फत पकडून दिले आहे.

उल्हासनगर - मिळकतीच्या मोजणीत येणाऱ्या लाखो रुपये बिलाच्या बदल्यात तडजोड म्हणून 50 हजार रुपयांची लाच देणाऱ्या व्यापाऱ्याला उल्हासनगर पालिकेचे करनिर्धार व संकलक युवराज भदाणे यांनी भ्रष्टाचारविरोधी पथकातील पोलिसांमार्फत पकडून दिले आहे.

आयुक्त राजेंद्र निंबाळकर, उपायुक्त दादा पाटील, युवराज भदाणे आणि कर निरीक्षकांच्या झालेल्या बैठकीत शहरातील मालमत्तेच्या नव्याने मिळकत मोजणी (असेसमेंट) करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात सत्यम मेडिकलच्या मिळकतीत वाढीव बांधकाम तसेच टेरेसवर टॉवर बसवण्यात आल्याची बाब भदाणे यांच्या निदर्शनास आली. या मिळकतीचे बिल वर्षाला साडेचार लाख रुपये येणार होते. ते येऊ नये, मिळकत मोजणी दडपून टाकावी यासाठी सत्यम मेडिकलचे मालक शंकर शिवनानी यांनी युवराज भदाणे यांना 50 हजार रुपये लाच देण्याचा प्रयत्न केला. ही तक्रार भदाणे यांनी भ्रष्टाचारविरोधी पथकाचे अधिकारी अतुल अहेर यांच्याकडे केली. त्यानुसार अहेर यांनी सायंकाळी सहा वाजता पालिकेत सापळा रचून शंकर शिवनानी यांच्यावर भदाणे यांना 50 हजाराची लाच देताना झडप घातली आहे. आयुक्त राजेंद्र निंबाळकर, उपायुक्त दादा पाटील यांनी भदाणेचे कौतुक केले.

भदाणे यांचा दुसरा रिव्हर्स ट्रॅप
दोन अडीच वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त बालाजी खतगावकर यांच्या कालावधीत भदाणे हे प्रभाग समिती 4 चे सहाय्यक आयुक्त होते. तेव्हा बांधकाम व्यावसायिक संजय गुप्ता यांनी भदाणे यांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा भदाणे यांनी गुप्ताला अँटी करप्शनकरवी पकडून दिले होते. सर्वत्र अधिकारी लाच प्रकरणात अटक होत असतानाच, भदाणे यांचा दुसऱ्यांदा "रिव्हर्स ट्रॅप'ची खेळी खेळली आहे. महाराष्ट्रात दुसऱ्यांदा अशी रिव्हर्स ट्रॅपची घटना प्रथमच घडली आहे.

Web Title: ulhasnagar news marathi news sakal news corruption case