मुख्य लेखापरीक्षक सुखदेव बलमे अडचणीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

उल्हासनगर - सरकारने घराजवळ बदली केल्यावरही, दोन दिवसांची रजा टाकून या कालावधीत उल्हासनगर पालिकेत येऊन मुख्य लेखापरीक्षक सुखदेव बलमे यांनी फाईलवर सह्या केल्याचे पडसाद बुधवारी झालेल्या महासभेत उमटले. शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे, स्वीकृत नगरसेवक मनोज लासी यांनी बलमे यांच्या सह्यांचा प्रकार सीसी टीव्ही कॅमेऱ्याने टिपला, असे सांगितल्यावर याची चौकशी करण्याचे आश्‍वासन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी महासभेला दिल्याने बलमे अडचणीत सापडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

उल्हासनगर पालिकेत मुख्य लेखापरीक्षक या महत्त्वाच्या पदावर सुखदेव बलमे आहेत. बलमे साडेतीन वर्षांपासून या पदावर कार्यरत आहेत. सरकारने बलमे यांची उपसंचालक वित्त व लेखा महाराष्ट्र राज्य लॉटरी विभाग; नवी मुंबई येथे ३१ मे रोजी बदली केली होती. पर्यायी व्यवस्था करून बलमे यांना पदमुक्त करण्याचे आदेशही सरकारने दिले होते; मात्र बलमे यांना हे समजताच त्यांनी १ आणि २ जून रोजी रजेचा अर्ज पालिकेकडे दिला. याच तारखांना पालिकेत हजर राहून काही फाईलींवर सह्या केल्या. हा प्रकार सीसी टीव्ही कॅमेराने टिपला आहे, अशी माहिती महासभेत देण्यात आली. 

तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली झाल्यावर त्यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. विजया कंठे यांच्याकडे पदभार सोपवला. अवघ्या एक दिवसाच्या आयुक्त ठरलेल्या कंठे यांनी सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करताना बलमे यांना पदमुक्त करून त्यांच्या जागी उपमुख्य लेखापरीक्षक विनायक फासे यांच्याकडे मुख्य लेखापरीक्षकाचा पदभार सोपवला; मात्र पुन्हा डॉ. शिंदे उल्हासनगरात आल्यावर त्यांनी कंठे यांनी जारी केलेली बलमे यांच्या पदमुक्ततेची ऑर्डर रद्द करून बलमे यांना थांबवून घेतले. 

बलमे यांना पदमुक्त करून त्यांच्या जागी विनायक फासे यांची नियुक्ती करावी. बलमे यांनी रजेच्या कालावधीत केलेल्या सह्यांची चौकशी करावी, अशी मागणी सुनील सुर्वे, मनोज लासी यांनी महासभेत केली. त्यावर चौकशी करण्याचे आश्‍वासन आयुक्त निंबाळकर यांनी दिले.

Web Title: ulhasnagar news ulhasnagar municipal corporation