घरपट्टी माफीवर सत्ताधाऱ्यांचा नांगर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

उल्हासनगर - भाजपने पालिका निवडणुकीतील वचननाम्यात 500 फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळातील मध्यमवर्गीय-गोरगरीब नागरिकांना घरपट्टी माफीची घोषणा केली होती. त्याच भाजपने शिवसेनेने मांडलेला घरपट्टी माफीचा प्रस्ताव साई पक्ष, टीम ओमी कलानीच्या नगरसेवकांच्या मदतीने महासभेत बहुमताने फेटाळण्यात आला. सत्ताधाऱ्यांनी वचननाम्याकडे पाठ फिरवत घरपट्टीच्या माफीवर नांगर फिरवला आहे, अशी टीका या वेळी शिवसेनेने केली. 

नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, नगरसेवक सुनील सुर्वे यांनी शहरातील 500 फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळात राहत असलेल्या गोरगरीब व मध्यमवर्गीय लोकांना घरपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला भाजपचे नगरसेवक व सभागृहनेता जमनू पुरुस्वानी, मनोज लासी यांच्यासहित सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध केला. या वेळी नगरसेवक सुर्वे, अरुण आशाण यांनी भाजपवर पलटवार करीत "भाजपने आपल्या वचननाम्यात गरिबांना घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्यात येईल', असे आश्वासन दिले होते, याची आठवण करून दिली. शेवटी या विषयावर मतदान घेण्यावर भाजपने जोर लावला. शिवसेना, रिपाइं, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भारिप बहुजन महासंघ, पीआरपी या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी घरपट्टी माफ करण्याच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले; तर महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन ईदनानींसह सत्ताधारी भाजप, साई पक्ष आणि टीम ओमी कलानीच्या नगरसेवकांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान करून प्रस्ताव फेटाळला. 

घरपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव लागू करता येणार नाही. अशा प्रकारची माफी केल्यास महापालिकेला 109 कोटी रुपयांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव स्वीकारता येणार नाही. 
- राजेंद्र निंबाळकर, आयुक्त

Web Title: ulhasnagar news water tax shiv sena