उल्हासनगरमध्ये प्रिंटर्सच्या धंद्यावर परिणाम 

उल्हासनगरमध्ये प्रिंटर्सच्या धंद्यावर परिणाम 

उल्हासनगर - मुंबईत प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत, ठाण्यात उमेदवारीवरून गोंधळ सुरू आहे; परंतु जवळच्या उल्हासनगरमध्ये निवडणूक असूनही निवडणुकीसारखे वातावरण अजिबात नसल्याचे दिसते. आचारसंहिता आणि जाचक अटी-शर्तींमुळे परवानग्या मिळत नसल्याने उमेदवारांसह कार्यकर्तेही हवालदिल झाले आहेत.

दुसरीकडे एरवी तेजीत असणारा प्रिंटर्सचा धंदासुद्धा मंदावला आहे. त्यामुळे दर निवडणुकीत ठिकठिकाणी दिसणारे पोस्टर्स, बॅनर्स, घराच्या छतावर फडणारे झेंडे यंदा कुठेही दिसत नाहीत.  

प्रत्येक शहरात रस्ते, घरांवर ठराविक पक्षाच्या बालेकिल्ल्यात त्या पक्षाची निशाणी, झेंडे-कटआऊट, बॅनर झळकताना दिसत होते. रस्त्यावरून कर्णा घेऊन रिक्षा फिरायच्या. यावरून  निवडणुकीचे वातावरण रंगात येत होते. शहरात मोठा छपाईचा उद्योग आहे. या निवडणुकीत प्रिंटर्सची दुकाने ओस पडली आहेत.

आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी आयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी राजेंद्र निंबाळकर, उपविभागीय अधिकारी, आचारसंहिता प्रमुख विजया जाधव, परवाना प्रमुख जमीर लेंगरेकर यांचे पथक सज्ज आहे. याचबरोबर सहा निवडणूक निर्णय अधिकारी, पालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी, अजित गोवारी आदींचे विशेष पथक सज्ज आहे. घरांवर, इमारतींवर बॅनर, कटआऊट, झेंडे लावायचे असतील, तर संबंधितांचा मालमत्ता कर थकीत नसावा. कर भरल्याची पुराव्यासह पावती व लेखी परवानगी हवी, सोबत ती व्यक्तीसुद्धा असावी. पोलिसांचा ‘ना हरकत दाखला’ सोबत जोडावा लागणार आहे. या जाचक अटी-शर्ती आचारसंहितेचा भाग असल्याने अनेक घरमालक या फंदात पडायला तयार नसल्याने बहुतांश उमेदवारांची निराशा झाली आहे. पॅनेलमध्ये असणारे जनसंपर्क कार्यालय, स्वतःचे वाहन यावर झेंडे लावण्याची परवानगी सहज मिळत आहे. 

यंदाची आदर्श आचारसंहिता कठोर आहे. घरमालकाच्या परवानगीशिवाय कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला बॅनर-कटआऊट, झेंडे लावता येणार नाहीत. तसे निदर्शनास आले तर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.  
- विजया जाधव, आचारसंहिता विभागप्रमुख.

परवानग्यांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. आदर्श आचारसंहितेंतर्गत कुणीही अटी-शर्तीचे पालन करणे अशक्‍य ठरत असल्यानेच त्याचे पडसाद अल्प प्रतिसादात उमटत आहेत.
- जमीर लेंगरेकर, परवाना प्रमुख.

भाजपचे झेंडे जप्त 
कॅम्प तीनमधील दशहरा मैदान परिसरात भाजपचे असंख्य झेंडे परवानगीशिवाय विजेच्या खांबांवर लावण्यात आले होते. ते जप्त करण्यात आले आहेत. सहायक आयुक्त अजित गोवारी यांनी अनोळखी व्यक्तींविरुद्ध मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पूर्वी एकच वॉर्ड असायचा. राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवारांसह अपक्ष नगरसेवक बॅनर, कटआऊट, होर्डिंग तयार करण्यासाठी एकच गर्दी करत होते. दिवस-रात्र काम चालायचे. आता चार वॉर्ड मिळून एकच पॅनेल करण्यात आले आहे. त्यात खर्च करणारा एकच उमेदवार अशी परिस्थिती आहे. त्याचा फटका सर्व प्रिंटर्सला बसला आहे. यामुळे धंदा ठप्प झाला आहे.
- शामभाई, जॉनी प्रिंटर्सचे मालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com