उल्हासनगरमध्ये घातक रसायनयुक्त केमिकलचा वास; डोळे,उलट्या, मळमळण्याचा त्रास

दिनेश गोगी
Monday, 11 January 2021

उल्हासनगरमध्ये मध्यरात्री घातक रसायनयुक्त केमिकलच्या वासामुळे शिवमंदिर परिसर गुदमरल्याची घटना घडली आहे.

मुंबईः उल्हासनगरमध्ये मध्यरात्री घातक रसायनयुक्त केमिकलच्या वासामुळे शिवमंदिर परिसर गुदमरल्याची घटना घडली आहे. शिवमंदिरच्या वरच्या भागावरून अज्ञातांनी वालधुनी नदीत घातक रसायनयुक्त केमिकल सोडल्याचं समजतंय. आज मध्यरात्री एकता नगर, शिवमंदिर, शिवगंगा नगर, समता नगर, हनुमान मंदिर, भरत नगर अशा परिसर संपूर्णतः भीतीने हादरून गेला आहे. उग्र वासाने नागरिकांना डोळ्यांचा, मळमळण्याचा, उलट्यांचा, गुदमरल्या सारखा त्रास होऊ लागला. 

रसायनाच्या वासाचे लोण सर्वत्र पसरू लागल्याने एकच खळबळ उडाल्यावर  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलिस आणि पालिकेला फोन केले.

मध्यरात्रीच मंडळाचे अधिकारी प्रमोद लोणे, शंकर वाघमारे, पोलिस, अग्निशमन दल, सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे, विशाल सोनवणे, संजय पाठारे उर्फ आफ्रिका आदींनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सर्वत्र अंधार असतानाही नदीची पाहणी करून अग्निशमन दलाच्या गाड्यातून रात्रभर नदीत पाण्याची फवारणी करण्यात आली. तरीही वासाच्या उग्रतेवर परिणाम पडत नव्हता.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

रात्री उशिराने अज्ञातांनी रासायनिक युक्त पाणी वालधुनी नदीत सोडले. त्यातून हळुवारपणे येणाऱ्या वासाची उग्रता मध्यरात्री अधिक तीव्र होऊ लागताच नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले. त्यामुळे एकच धावपळ उडाली.

अग्निशमन दलाने असंख्य गाड्यातील पाण्याची फवारणी नदीत केल्यावरही वासाची उग्रता कमी होत नसल्याने आणखीन अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले.

हेही वाचा- तापमानात घट झाल्याने 31 टक्क्यांनी वाढला हृदयविकाराचा धोका

दरम्यान यापूर्वी पश्चिमेला असलेल्या वडोल गाव येथून केमिकल सोडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. प्रथमच पूर्वेकडील शिवमंदिरच्या वरच्या भागातून केमिकल सोडण्यात आल्याची पहिलीच घटना घडली आहे. याची सखोल चौकशी करावी अशी मागणी शिवसेना उपशहरप्रमुख परशुराम पाटील यांनी केली आहे. 

रसायनयुक्त केमिकलच्या उग्र वासाने डोळ्यांना चुरचुरणे, मळमळणे, उलट्यांचा, गुदमरल्या सारखा त्रास सकाळपर्यंत सहन करावा लागला, अशा प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रमोद लोणे, शंकर वाघमारे हे पहाटे 3 वाजेपर्यंत घटनास्थळी होते. त्यांनी आज सकाळी पुन्हा उल्हासनगर गाठले आहे. सर्व पाहणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Ulhasnagar Smell hazardous chemicals Trouble with eyes vomiting nausea


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ulhasnagar Smell hazardous chemicals Trouble with eyes vomiting nausea