उल्हासनगरमध्ये दुचाकीस्वारांचे खड्यात शिर्षासन 

दिनेश गोगी
रविवार, 14 जुलै 2019

उल्हासनगर : गेल्या दोन वर्षांपासून खड्डे भरण्याच्या निविदाच काढण्यात आल्या नसल्याने उल्हासनगरातील शान समजल्या जाणाऱ्या प्रमुख चौकांच्याच खड्यांच्या चाळण्या झाल्या आहेत या खड्यात अनेक दुचाकीस्वार शिर्षासन करत असतानाचे चित्र दिसत असून दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या सिंधी समाजाच्या 40 दिवसांच्या उपवास व्रतावर देखील खड्यांचे संकट उभे राहिले आहे. 

उल्हासनगर : गेल्या दोन वर्षांपासून खड्डे भरण्याच्या निविदाच काढण्यात आल्या नसल्याने उल्हासनगरातील शान समजल्या जाणाऱ्या प्रमुख चौकांच्याच खड्यांच्या चाळण्या झाल्या आहेत या खड्यात अनेक दुचाकीस्वार शिर्षासन करत असतानाचे चित्र दिसत असून दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या सिंधी समाजाच्या 40 दिवसांच्या उपवास व्रतावर देखील खड्यांचे संकट उभे राहिले आहे. काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने एकीकडे असंख्य सखल भाग हे पाण्यात गेले असतानाच दुसरीकडे उल्हासनगरातील काँक्रीट व डांबरीकरणच्या रस्त्याची खड्यांनी जागा घेतली आहे. 

कलानी महल चौकाच्या परिसरात चाळण्या दिसत आहेत. अशीच परिस्थिती काही नगरसेवकांच्या ऑफिसच्या समोरचीही आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, झूलेलाल मंदिर, गोलमैदान, मधुबन, शांतिनगर स्मशानभूमी, हिराघाट, श्रीराम, पेट्रोल पंप, नेताजी, व्हीनस, आदि चौक हे उल्हासनगरातील शान समजले जातात. मात्र या चौकांच्याच खड्यांनी चाळण्या केल्याने हा टिकेचा विषय बनला आहे.पवई चौक ते विट्ठलवाडी,श्रीराम पेट्रोल पंप ते मानेरा,लालचक्की पाणी पुरवठा कार्यालया समोर आदि रस्त्यावर एवढ्या चाळण्या झाल्या असून त्यातून वाट काढणे वाहन चालकांसाठी कसरतीचे ठरत आहे. हे खड्डे किंबहुना चाळण्या पाण्यात असल्यास त्याचा अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकीस्वारांच्या गाड्या त्यात फसुन त्यांच्यावर शिर्षासनाची वेळ येते. 

दरम्यान, पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी खड्डे भरण्यासाठी तातडीने 50 लाख रूपयांच्या निधीची मंजूरी दिली आहे. मात्र त्यास अद्यापही गती देण्यात आली नसल्याने ज्या प्रमाणे काही महिन्यापूर्वी समाजसेवक, दिव्यांगांचे नेते भरत खरे यांचा खड्यांनी बळी घेतला. त्याप्रमाणे पालिकेला भरत खरे यांच्या सारख्या आणखीन काही नागरिकांच्या बळीची प्रतिक्षा आहे काय? असा सवाल आधार प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष संदीप डोंगरे यांनी उपस्थित केला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ulhasnagar a two-wheeler stuck in pothole