वज्रेश्वरीमध्ये रस्त्यांच्या कामामुळे नागरिकांची गैरसौय

दीपक हीरे
रविवार, 17 जून 2018

येथील जिल्हा मार्गाचे सुरू असलेले रुंदीकरणाचे काम, कामासाठीच्या रस्त्याखालील ड्रेनेज व गटारीचे काम व त्यामुळे रस्त्याची झालेली दुरवस्था तसेच नादुरुस्त जलवाहिनीमुळे मुख्य रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि उघड़ी अर्धवट गटारी यामुळे मोठा अपघात होऊन येणाऱ्या पावसाळ्यात येथील वाहतुकीला मोठ्या प्रमाणात धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वज्रेश्वरी: येथील जिल्हा मार्गाचे सुरू असलेले रुंदीकरणाचे काम, कामासाठीच्या रस्त्याखालील ड्रेनेज व गटारीचे काम व त्यामुळे रस्त्याची झालेली दुरवस्था तसेच नादुरुस्त जलवाहिनीमुळे मुख्य रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि उघड़ी अर्धवट गटारी यामुळे मोठा अपघात होऊन येणाऱ्या पावसाळ्यात येथील वाहतुकीला मोठ्या प्रमाणात धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीचा हा धोका लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज प्रवासी व नागरिकांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात शिवसेना आक्रमक झाली असून भिवंडी तालुका सचिव भूपेंद्र शाह यांनी तीर्थ क्षेत्रातील रस्त्याबाबत पालक मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेउन येथील मुख्य रस्त्याची समस्या मांडली. येथील वज्रेश्वरी देवी मंदिरा जवळून जाणारा अंबाडी उसगांव या मुख्य रस्त्याचे रुंदीकरणाचे काम गेल्या दोन महिन्यापासून सुरु आहे.

रस्त्यामध्ये येणारे पाणी, पर्यायी मार्गाची वाणवा, सुरक्षित वाहतुकीच्या नियोजनाबाबत होणारे दुर्लक्ष व सध्याच्या रस्त्याची दुरवस्था यामुळे पावसाळ्यात येथील वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या याच कामामुळे येथे वाहतुकीची समस्या वारंवार निर्माण होत आहे. आगोदरच रुंदीकरणाच्या कामामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. 

तक्रार करुनही आजपर्यंत मंजूर होऊन वर्कऑर्डर निघालेल्या रस्त्याचे काम सुरु होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी रुंदीकरणात येणारे विद्युत खांब अद्यापही काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मुख्य रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून येथे कसल्याही प्रकारचे नियोजन झालेले दिसत नाही. 

रस्त्यांची परिस्थिती अशीच राहिल्यास येत्या पावसाळ्यात वाहतुकीचा बोजवारा उडल्याशिवाय राहणार नाही. वाहतूक कोंडी व छोटमोठ्या अपघातांची संख्या वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने मुख्य रस्त्याची डागडुजी करण्याचे तसेच पर्यायी रस्त्यांचे नियोजन करणे गरजेचे आहे.

Web Title: Unaware of the people due to road work in Vajreshwari