मुंबईकरांसाठी भूमिगत वाहनतळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

वाढत्या वाहनांमुळे मुंबईत महापालिका भूमिगत पार्किंग सुविधा उपलब्ध करणार असून त्याबाबतच्या प्रस्तावाला सुधार समितीची मंजुरी मिळाली आहे...

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी आणि वाहनतळांच्या कमतरतेवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने भूमिगत वाहनतळ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील मनोरंजन मैदाने, क्रीडांगणे, बगीचे, उद्याने आदी मोकळ्या जागांवर ‘अंडरग्राऊंड पार्किंग’ सुविधा उभारण्यात येईल. सुधार समितीच्या बैठकीत मंजुरी मिळालेला प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल.

वांद्र्यातील पटवर्धन उद्यान आणि भायखळ्यातील झुला मैदानात महापालिकेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर भूमिगत वाहनतळ बांधले जाणार होते. तथापि, स्थानिकांच्या विरोधानंतर महापालिका प्रशासनाला प्रस्ताव मागे घ्यावा लागला. त्याबदल्यात महापालिकेने मनोरंजन मैदाने, क्रीडांगणे, उद्याने व बगीचांसह, मोकळ्या जागांवर आरक्षित असलेल्या जमिनीखाली एक किंवा दोन मजली भूमिगत वाहनतळ बनवण्याच्या निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार विकासक किंवा वाहनतळांची गरज असलेल्या संस्थांना भूमिगत वाहनतळ बांधण्याची परवानगी पालिकेकडून  दिली जाईल. भूमिगत वाहनतळांच्या धोरणाला महापालिका सुधार समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली. हे धोरण आता राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे. 

राज्य सरकारच्या मंजुरीनंतर पालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत वाहनतळाच्या विकासकाला हस्तांतरक्षम विकास हक्क (टीडीआर) द्यायचे की चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) द्यायचा याबाबतचा निर्णय घेतला जाईल. असे भूमिगत वाहनतळे बांधल्यास शहरातील पार्किंगची समस्या सुटेल, असे सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब यांनी सांगितले.

विरोधाची शक्यता?
मुंबईतील अनेक मोकळे भूखंड वेगवेगळ्या योजनांच्या नावावर हडप केले गेले आहेत. आता भूमिगत वाहनतळ धोरणामुळे मनोरंजन मैदाने आणि क्रीडांगणेही विकासकांच्या ताब्यात जाण्याची शक्‍यता असल्याने त्यालाही विरोध होण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An underground vehicle parking in Mumbai