esakal | "अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ठणठणीत, दररोज खेळतो बॅडमिंटन"
sakal

बोलून बातमी शोधा

dawood ibrahim

"अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ठणठणीत, दररोज खेळतो बॅडमिंटन"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची तब्येत ठणठणीत असून तो दररोज व्यायामासाठी बॅडमिंटन खेळत असल्याचे त्याचा भाऊ इक्बाल कासकरने केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीत सांगितले आहे. दाऊदची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याच्या बातम्या या निव्वळ अफवा असल्याचे कासकरनं म्हटलं आहे. (Underworld don Dawood fit every day plays badminton aau85)

हेही वाचा: दक्षिण अफ्रिकेत दंगल; 'गुप्ता ब्रदर्स' ठरले आणीबाणीला कारणीभूत

दाऊद आणि छोटा शकील हे दोघे पाकिस्तानातून भारतात अंमलीपदार्थांच्या तस्करीचा व्यवसाय करत असल्याचेही कासकरच्या चौकशीतून समोर आले आहे. दाऊदच्या ‘डी’ कंपनीचे अमली पदार्थ अफगाणिस्तानमार्गे पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात येतात; मात्र, सध्या कोरोना काळात त्याचे मार्ग बदलले आहेत. इक्बाल कासकरचे या भागात संपर्क जाळे असून त्याचा वापर करूनच हे तस्कर भारतात अमली पदार्थ आणत असल्याचे समोर आले आहे. याची अधिक माहिती घेण्यासाठी केंद्रीय अंमलीपदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) न्यायालयाकडे अर्ज करून कासकरच्या चौकशीची परवानगी मागितली होती. ती मिळाल्यानंतर कासकरची नुकतीच चौकशी करण्यात आली. त्यामध्ये कासकरने दाऊदबाबतच्या काही महत्त्वपूर्ण बाबींचा खुलासा केला आहे.

दाऊदच्या नेटवर्कची महत्त्वपूर्ण माहिती बाहेर

कासकरच्या चौकशीवरून दाऊदच्या नेटवर्कशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती ‘एनसीबी’च्या हाती आली आहे. डी कंपनीचे ड्रग्ज जम्मू काश्मीर आणि अजमेर येथून भागांतून दिल्ली आणि मुंबईपर्यंत पोहचत असल्याचेही तपासातून समोर आले आहे. ही तस्करी कुठल्याही मोठमोठ्या वाहनांमधून न होता चक्क दुचाकीवरून केली जाते. हौशी पर्यटक असल्याच भासवत हे दुचाकीस्वार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात अमली पदार्थ पोहोचवत असल्याचे सांगण्यात आले.

महिलेला अटक

इक्बाल कासकरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नागपाड्यातून एका महिलेला अटक केली आहे. हुसैन बी नावाची ही महिला जम्मू काश्मीरमधून अमली पदार्थांची तस्करी करून ते देशातील इतर भागात पोचवत असे.

loading image