राज्यात बेरोजगारी वाढली - कॉंग्रेस

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 एप्रिल 2018

मुंबई - राज्यातील घटलेले व्यावसायिक कराचे संकलन हे संघटित उद्योग क्षेत्रातील वाढत्या बेरोजगारीचे निदर्शक असून, राज्यातील औद्योगिक क्षेत्र फडणवीस सरकारच्या गेल्या साडेतीन वर्षांच्या काळात कुंठत चालले आहे याचे निदर्शक आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 'मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र अशा शब्दच्छलातून आणि विविध उद्योगांशी झालेल्या सामंजस्य कराराचे आठ लाख कोटी, सोळा लाख कोटी असे अतिरंजीत आकडे जनतेच्या तोंडावर फेकून मुख्यमंत्री लाखो तरुणांना नोकरीची स्वप्ने विकण्याचा उद्योग करीत आहेत. परंतु यातून वास्तविकतेची दाहकता लपवता येणार नाही,'' अशी टीका सावंत यांनी केली.

राज्यातील संघटित क्षेत्रातील रोजगारांची स्थिती राज्यातील व्यवसाय करांच्या संकलनातून स्पष्ट होत असते. प्रतिवर्षी कर संकलन हे वाढते असेल तर राज्यातील रोजगारनिर्मितीत वाढ होत आहे असे समजले जाते. परंतु फडणवीस सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात या कर संकलनामध्ये घसरण झाली आहे. या वर्षी व्यावसायिक कर संकलन उद्दिष्टापेक्षा 652 कोटी रुपये कमी होऊन 2117 कोटी रु. झाले आहे. याचाच अर्थ फडणवीस सरकार विविध क्षेत्रांबरोबर राज्यातील युवकांना रोजगार देण्याबाबतीतही सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.

Web Title: unemployed congress politics