रेल्वेच्या "लेट'लतीफ कारभाराचा फटका केंद्रीय मंत्र्यांनाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

ठाणे : मध्य रेल्वेच्या विस्कळित कारभाराची सर्वसामान्य चाकरमान्यांना सवय झाली आहे; मात्र त्याचा फटका शनिवारी चक्क केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना बसला. सोलापूरला जाणारी सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेस ठाणे रेल्वेस्थानकात उशिरा आल्याने आठवले यांना स्थानकातच दोन तास तिष्ठत बसावे लागले. या वेळी कवीमनाच्या रामदास आठवले यांनी हा विलंबही सत्कारणी लावत रेल्वे फलाटावर खुर्चीत आसनस्थ होत कार्यकर्त्यांशी संवाद साधून वेळ सत्कारणी लावला. 

मध्य रेल्वे प्रशासनाचे वेळापत्रक विस्कळित झाल्याचा फटका मेल-एक्‍स्प्रेस आदी लांब पल्ल्याच्या गाड्यांना नेहमीच बसतो. याशिवाय इतर घटना व दुर्घटनांमुळेही गाड्या विलंबाने धावत असतात. शनिवारीही बोरघाटात पावसामुळे दरड पडल्याच्या घटना घडल्याने अनेक गाड्या विलंबाने धावत होत्या. त्याचा फटका लोकल गाड्यांचे वेळापत्रक विस्कळित होण्याबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्याही विलंबाने सुटण्यावर झाले. केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले एका कार्यक्रमासाठी सोलापूर येथे सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेसने निघाले होते. 

खुर्ची मांडून बस्तान 

आठवले रात्री ठाणे रेल्वेस्थानकात गाडीच्या नियोजित वेळेत (11:30 वा.) पोहचले होते; मात्र सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेस तब्बल दोन तास विलंबाने धावत असल्याचे कळल्याने आठवले यांनी सुरुवातीला ठाणे पूर्वेकडील पार्किंग क्षेत्रात आपल्या मोटारीत बसून काही वेळ घालवला.

काही वेळातच रिपाइंच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याने रेल्वे विश्रामगृहात विश्रांती घेण्याऐवजी ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाचवर खुर्ची मांडून बस्तान ठोकत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अखेर रात्री सव्वाएक वाजल्यानंतर ठाण्याला पोहचलेल्या सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेसने आठवले सोलापूरकडे रवाना झाले. 

Web Title: Union ministers are also in Problems of the railway system