शेळ्या-मेंढ्यांना युनिक कोड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

देवनार कत्तलखान्यात विक्रीसाठी येणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांची चोरी होऊ नये म्हणून युनिक आयडेंटी क्रमांक देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे... 

मुंबई : बकरी ईदसाठी देवनार कत्तलखान्यात विक्रीसाठी येणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांची चोरी होऊ नये म्हणून युनिक आयडेंटी क्रमांक देण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. १२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बकरी ईदसाठी कत्तलखान्यात ८१ हजार शेळ्या-मेंढ्या दाखल झाल्या आहेत.

बकरी ईदच्या काळात कत्तलीसाठी महापालिकेकडून एक दिवसाचे परवानेही दिले जातात. शहरात आरोग्यदायी मांसाची विक्री व्हावी म्हणून प्राण्यांची वैद्यकीय तपासणीही केली जाते. बारकोड तपासूनच शेळी-मेंढी बाहेर पाठवली जाईल, असे कत्तलखान्याचे महाव्यवस्थापक 
डॉ. योगेश शेट्ये यांनी सांगितले. व्यापाऱ्याकडून प्राणी विकत घेतल्यानंतर युनिक कार्ड व्यापारी ग्राहकाला देईल. कत्तलखान्याच्या बाहेर पडताना त्या कार्डची नोंद तपासून प्राणी बाहेर सोडला जाईल, असेही डॉ. शेट्ये यांनी सांगितले.

पैशांची चोरी रोखण्यासाठी एटीएमही 
बकरी ईदच्या काळात पैसे चोरीला जाण्याचे प्रकारही होतात. त्यावरही पालिकेने स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मदतीने तत्काळ खाते उघडून देण्याचा निर्णय घेतला. एटीएमही सुरू करण्यात आले असून ऑनलाईन व्यवहाराची सुविधाही देण्यात येणार आहे.

कचऱ्यापासून वीजनिर्मिती 
कत्तलखान्याच्या परिसरात १५ हजार टन जैविक कचरा तयार होण्याची शक्‍यता आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. ती वीज कत्तलखान्यांसाठीच वापरली जाणार आहे. कचरा जमा करण्यासाठी  ३०० सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसह १५ ठिकाणी कचरा डेपो तयार करण्यात आले आहेत. 

       अशा आहेत इतर सुविधा 

  • कत्तलखान्यात पुरेसा वीजपुरवठा
  • जनावरे आणि माणसांसाठी पुरसे पाणी 
  • शेळ्या-मेंढ्यांसाठी ४० हजार चौरस मीटरची शेड. ५० हजार चौरस मीटरची  अतिरिक्त शेड. मोठ्या जनावरांसाठी २५ हजार चौरस मीटरची शेड
  • १६ वॉच टॉवर, २०९ सीसी टीव्ही कॅमरे, मेटल डिटेक्‍टर आणि डोअर मेटल डिटेक्‍टर
  • ३०० सुरक्षा रक्षक तैनात राहणार
  • माणसांसाठी दोन दवाखाने आणि दोन रुग्णवाहिकांची सुविधा 
  • दोन लाख शेळ्या-मेंढ्या येणार 
  • १० हजार म्हैशी आणि रेडे 
  • ८१ हजार ३०८ शेळ्या मेंढ्या दाखल
  • १ हजार ५०० मोठी जनावरे दाखल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unique code for goats and sheep arriving at Devnar slaughterhouse in Mumbai