क्‍लस्टरविरोधात ‘एकजूट, एक मूठ’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

ठाणे - क्‍लस्टर (समूह पुनर्विकास) योजना विकसकांसाठी ठाण्यात आणली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून आगरी-कोळी बांधवांना गावठाणांतून उखडून फेकण्याचा डाव सुरू आहे. सध्या राहत्या घराला जितका मोठा गोठा असतो, तेवढे घर आपल्याला या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे. बेकायदा बांधकामांना जे निकष लावण्यात येत आहेत, तेच घरांना लावण्यात आले आहेत, असा आरोप करत क्‍लस्टरविरोधात सर्व आगरी-कोळी बांधवांनी एकजूट करून एक मूठ केली पाहिजे, असा निर्णय रविवारी (ता. २७) रात्री बाळकूम येथे झालेल्या शेतकरी-गावकरी मार्गदर्शन सभेत घेण्यात आला.

ठाणे - क्‍लस्टर (समूह पुनर्विकास) योजना विकसकांसाठी ठाण्यात आणली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून आगरी-कोळी बांधवांना गावठाणांतून उखडून फेकण्याचा डाव सुरू आहे. सध्या राहत्या घराला जितका मोठा गोठा असतो, तेवढे घर आपल्याला या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे. बेकायदा बांधकामांना जे निकष लावण्यात येत आहेत, तेच घरांना लावण्यात आले आहेत, असा आरोप करत क्‍लस्टरविरोधात सर्व आगरी-कोळी बांधवांनी एकजूट करून एक मूठ केली पाहिजे, असा निर्णय रविवारी (ता. २७) रात्री बाळकूम येथे झालेल्या शेतकरी-गावकरी मार्गदर्शन सभेत घेण्यात आला. विशेष म्हणजे या सभेसाठी बस तसेच खासगी वाहने खचाखच भरून हजारो महिला आणि पुरुष दाखल झाले होते. त्यामुळे भविष्यात क्‍लस्टर योजनेला अधिक विरोध होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील झोपड्या, बेकायदा आणि धोकादायक इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी प्रशासनातर्फे क्‍लस्टर योजना राबवण्यात येत आहे; मात्र या योजनेला शहरातील गावठाण आणि कोळीवाडा भागातील रहिवाशांनी कडाडून विरोध सुरू केला आहे. बेकायदा ठरलेल्या बांधकामांचा महापालिकेने क्‍लस्टर योजनेत समावेश केल्याने येथील नागरिकांनी विरोधाचा सूर लावला आहे. घोडबंदर भागातील कासारवडवली, मोघरपाडा, वाघबिळ, बाळकुम, कोलशेत, कोळीवाडा, भाईंदरपाडा आणि विटावा भागातील रहिवाशांनी पालिकेच्या मुख्यालयात येऊन या योजनेस लेखी हरकती नोंदवल्या. त्यातच रविवारी रात्री बाळकूम येथील मैदानात क्‍लस्टर योजना म्हणजे काय आणि ती झाल्यास त्याचे दुष्परिणाम काय होतील. याच्या मार्गदर्शनासाठी आगरी कोळी बांधवांची सभा झाली. या वेळी ॲड. भारद्वाज चौधरी, नवी मुंबईतील आगरी समाजाचे नेतृत्व करणारे नीलेश पाटील उपस्थित होते. 

आपले घर हजारभर चौरसफूट मोठे असते; मात्र आपल्याला फक्त ३२२ चौरस फूट घर देण्यात येणार आहे. इतका मोठा आमच्या घरामागचा गोठाच असतो. तसेच विकासाच्या नावाखाली आपल्या जमिनी विकसकांच्या घशात घालण्यास सुरुवात झालेली आहे, असा आरोप या वेळी आयोजकांनी केला. राज्य सरकारचे कामकाज मराठीमधून चालते, तर ही अधिसूचना इंग्रजीतून का काढण्यात आली, असा प्रश्‍नही या वेळी उपस्थित करण्यात आला.

अशी टाकणार पुढील पावले...
क्‍लस्टर योजनेविरोधात आणखी एक लाख हरकती नोंदवण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहन.
ठाणे महापालिकेतील आगरी-कोळी समाजाच्या लोकप्रतिनिधींकडून ही सूचना रद्द करण्यासाठी लेखी आश्‍वासन मिळवण्यासाठी प्रयत्न.
सर्व गावठाणांचे सीमांकन करणार. यामुळे प्रत्येक घर नियमित करता येईल.
लोकप्रतिनिधींना समाजाविषयी खरंच आपुलकी वाटत असेल, तर त्यांनी या क्‍लस्टर योजनेविरोधात सभागृहात आवाज उठवण्याचे आवाहन करणार.
येत्या १९ जूनपूर्वी गावठाणांची एकत्रित परिषद घेणार.
प्रत्येक गावठाणामध्ये जाऊन क्‍लस्टर योजनेविषयी सविस्तर माहिती देणार.

Web Title: United against Group redevelopment