"आयडॉल'च्या विद्यार्थ्यांची कोंडी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

मुंबई - मुंबई विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा गोंधळ यंदाही कायम आहे. दूरस्थ आणि मुक्त शिक्षण संस्थेतून (आयडॉल) टीवाय बीएससीच्या सहाव्या सत्राची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे वेळापत्रक एक आठवडाआधी जाहीर केले आहे. बहुतेक विद्यार्थी हे नोकरी करून शिक्षण घेत असल्यामुळे त्यांना ऐन वेळी सुट्टी मिळणे कठीण असल्याने नियोजित परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली आहे. 

विद्यापीठाच्या दूरस्थ व मुक्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळामार्फत घेण्यात येते. आयडॉलमधून टीवाय बीएससीच्या सहाव्या सत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सहाव्या सत्राची परीक्षा 14 मेपासून सुरू होणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक तीन ते चार आठवडे आधी जाहीर होणे अपेक्षित होते; मात्र विद्यापीठाने परीक्षेचे वेळापत्रक 7 मे रोजी जाहीर केले, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. वेळापत्रकावर एप्रिलची तारीख आहे; मात्र हे वेळापत्रक 7 मे रोजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. आयडॉलमधून शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे नोकरी करतात. त्यांना ऐन वेळी परीक्षेसाठी सुट्टी मिळणे अशक्‍य आहे. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षाच देता येणार नाही. त्यामुळे विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे केली आहे. 

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वारंवार वेळापत्रक चेक करत होतो. हे वेळापत्रक 7 मे रोजी संकेतस्थळावर दिसू लागले; तसेच हॉल तिकीटही मिळालेले नाही. 
- असिम शेख, विद्यार्थी 

Web Title: University of Mumbai has done a lot of confusion in the exams