खाऊचे आमिष दाखवून शाळकरी मुलावर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

भिवंडीच्या शांतीनगर परिसरातील अंसार नगर परिसरात राहणाऱ्या एका 13 वर्षीय शाळकरी मुलास खाऊचे आमिष दाखवून त्याच्यावर तिघांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

भिवंडी : भिवंडीच्या शांतीनगर परिसरातील अंसार नगर परिसरात राहणाऱ्या एका 13 वर्षीय शाळकरी मुलास खाऊचे आमिष दाखवून त्याच्यावर तिघांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघा नराधमांविरोधात गुन्हा दाखल करून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. अख्तर मोईनुद्दीन सैय्यद (27, रा. शांतीनगर), रब्बी ऊर्फ अंसरार अहमद मुस्ताक सिद्दीकी (26 रा. अंसारनगर) व तबरेज ऊर्फ बब्बर मुस्ताक सिद्दीकी (23) अशी आरोपींचे नावे आहेत. 

अंसारनगर येथील पीडित मुलगा आपल्या आईवडिलांसह राहतो. नराधम त्रिकुटाने मुलाला खाऊचे आमिष दाखवून कोटरगेट, पोगाव व चाविंद्रा परिसरातील नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी, झाडाझुडपात नेवून त्याला मादक पदार्थांचे सेवन करण्यास लावत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. पीडित मुलावर तीन महिन्यांपासून अत्याचार सुरू असून असह्य वेदना होत असल्याने त्याने याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली.

मुलाच्या वडिलांनी तत्काळ तालुका पोलिस ठाण्यात नराधमांविरोधात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधम अख्तर आणि अंसरार यांना अटक केली आहे. त्यांना मंगळवारी (ता.5) ठाण्याच्या विशेष न्यायालयात हजर केले असता, त्यांना 11 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फरार आरोपी तबरेजचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक भोई अधिक तपास करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unnatural act on school child