मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्याला तुरुंगवास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

घरातून फुटबॉल खेळण्यासाठी निघालेल्या अकरा वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्याला सात वर्ष तुरुंगवास आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

ठाणे : घरातून फुटबॉल खेळण्यासाठी निघालेल्या अकरा वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या शेजाऱ्याला ठाणे सत्र न्यायालयाने सात वर्ष तुरुंगवास आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

संजय पारेख (40) असे नराधम आरोपीचे नाव असून, तो दुकान व्यावसायिक आहे. ठाणे जिल्हा व सत्र विशेष न्यायलयाचे न्यायाधीश के.डी.शिरभाते यांनी आज (बुधवार) हा निकाल दिला. ही घटना 7 जून 2016 रोजी काशीमीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या खटल्यात सरकारी वकील म्हणून संजय मोरे यांनी काम पाहिले.

आरोपी पारेख हा घरात एकटाच असताना, त्याच परिसरात राहणारा अकरा वर्षीय पीडित मुलगा मैदानात फुटबॉल खेळण्यासाठी जात होता. आरोपीने त्याला घरात बोलावून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, त्याचवेळी आरोपीच्या घरी पीडित मुलाची आई पोहचली असता पारेख याने कोणालाही काही न सांगता, घरातून निघून जाण्यास सांगितले. मात्र, पीडित मुलाने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी काशीमिरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी पारेख याला तात्काळ अटक केली.

या खटल्याची अंतिम सुनावणी न्या. शिरभाते यांच्या न्यायालयात पार पडली. यावेळी सरकारी वकील मोरे  यांनी पीडित मुलगा त्याचे वडिल आणि वैद्यकीय अधिकार्यांसह सात साक्षीदारांची साक्ष नोंदवली. न्या. शिरभाते यांनी सादर केलेले साक्षीपुरावे ग्राह्य मानून पारेख याला अनैसर्गिक अत्याचार तसेच पॉक्सो कायद्यानुसार सात वर्ष तुरुंगवास आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unnatural sex with minor boy and penalty accused at thane