पहिल्याच पावसात मुंबईचा बोजवारा उडणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

छोट्या आणि मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी पालिकेला कंत्राटदार मिळत नाहीत. एनजीओंच्या कामगारांनी नाल्यांतून काढलेला गाळ उचलण्यासाठी कंत्राटदार नाहीत. नालेसफाईच्या कामांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे पहिल्याच पावसात मुंबईचा बोजवारा उडण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत फक्त 12 टक्के नालेसफाई झाल्याचे समजते. शहर भागाला नालेसफाईतील दिरंगाईचा सर्वाधिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुंबई - छोट्या आणि मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी पालिकेला कंत्राटदार मिळत नाहीत. एनजीओंच्या कामगारांनी नाल्यांतून काढलेला गाळ उचलण्यासाठी कंत्राटदार नाहीत. नालेसफाईच्या कामांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे पहिल्याच पावसात मुंबईचा बोजवारा उडण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत फक्त 12 टक्के नालेसफाई झाल्याचे समजते. शहर भागाला नालेसफाईतील दिरंगाईचा सर्वाधिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुंबईत मोठे नाले 151.19 किलोमीटर आणि छोटे नाले 418.75 किलोमीटर इतक्‍या लांबीचे आहेत. या नाल्यांची सफाई पावसाळ्यापूर्वी 60 टक्के करायची आहे. मात्र मे सुरू झाला तरी अजूनही नालेसफाईच्या कामांना वेग आलेला नाही. छोट्या नाल्यांच्या कामासाठी एक लाख 11 हजार इतके कामगार जुंपले जाणार आहेत. रस्त्यांच्या लगत असलेल्या दोन हजार नाल्यांची सफाईची कामेही अद्याप सुरू झालेली नाहीत. वस्त्यांमध्ये छोट्या नाल्यातून काढून ठेवलेला गाळ, कचरा अजूनही उचललेला नाही. कचरा उचलण्यासाठी कंत्राटदार नसल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. मोठ्या नाल्यांची स्थिती तशीच आहे. मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठीही निविदा काढून कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळालेला नाही. नालेसफाईच्या कामात दिरंगाई केल्यामुळे कंत्राटदार आणि अभियंत्यांवर कारवाई झाली. त्या भीतीने कंत्राटदार कामासाठी पुढे येत नसल्याचे समजते. परिणामी नाल्यांची सफाईकामेही रखडली आहेत. ही कामे आता पावसाळ्यापूर्वी होतील की नाही, याबाबत सांशकता व्यक्त होत आहे. रेल्वेच्या नालेसफाईला वेग नाही. मिठी नदीच्या सफाईबाबत प्रशासन गंभीर नाही.

■ शहरात पाणी तुंबण्याचा धोका
दादर, माटुंगा आणि परळ या भागात दर वर्षी मोठ्या पावसात पाणी भरते. यंदा नालेसफाईची कामे करण्यासाठी या भागात कंत्राटदार नेमलेले नाहीत. या भागात काढून ठेवलेला गाळही उचलेला नाही. त्यामुळे स्थानिकांच्या तक्रारी वाढू लागल्याची माहिती पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली. नालेसफाईतील दिरंगाईला सत्ताधारी आणि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

■ नालेसफाईसाठी कोट्यवधी
मोठे नाले : 60 कोटी रुपये
छोटे नाले : 29 कोटी
मिठी नदी : 31 कोटी
एनजीओ कामगार : 30 कोटी
रेल्वे नालेसफाई : 6 कोटी

■ नाल्यांची लांबी
मोठे नाले : 251.19 किमी
छोटे नाले : 418.75 किमी
बॉक्‍स ड्रेन : 621.46 किमी
रस्त्यालगत गटार : 1119.69 किमी

Web Title: Unsufficient management for rainly season in Mumbai