राष्ट्रवादीमध्ये नाराजीचा सूर!

सुजित गायकवाड
बुधवार, 3 मे 2017

नवी मुंबई - महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या झालेल्या निवडणुकीत पदे भोगलेल्यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्याने नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे; तर पक्षात माजी महापौरांचा हस्तक्षेप वाढत असल्यामुळेही काही नगरसेवक खासगीत नाराजी बोलून दाखवत आहेत. पक्षाकडून वारंवार मिळणाऱ्या अपमानकारक वागणुकीमुळे काही नाराज नगरसेवकांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग समित्यांची काही दिवसांपूर्वीच निवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादी व शिवसेनेचे संख्याबळ जास्त असल्याने आठपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला सात तर शिवसेनेला एक प्रभाग समिती मिळाली. यात वाशी प्रभाग समितीवर शशिकांत राऊत यांना पुन्हा पक्षाने संधी दिल्याने वाशीतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका दिव्या गायकवाड नाराज आहेत. राऊत यांना निवडून आल्यानंतर स्थायी समितीवर पाठवले होते; मात्र तरीही माजी मंत्री गणेश नाईकांच्या निकटवर्तीयांपैकी एक असल्याने पुन्हा त्यांची निवड केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. याउलट दिव्या गायकवाड यांनी प्रभाग समित्या गठीत व्हाव्यात, यासाठी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात रणशिंग फुंकून आंदोलनाचा इशारा दिला होता; तर प्रभाग समित्यांचा प्रस्ताव पटलावर येत नसल्याने थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण करण्याचा इशाराही दिला होता; मात्र त्यानंतरही पक्षाने प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत गायकवाड यांना हेतुपरस्पर बाजूला केल्याने त्यांनी खासगीत खंत व्यक्त केली. यामुळे पक्षाच्या महत्त्वाच्या बैठका, महासभेपूर्वी घेतल्या जाणाऱ्या पूर्वबैठकांना त्या गैरहजर असतात; तर दुसरीकडे स्थायी समितीवर नगरसेवक अशोक गावडे व सुरेश कुलकर्णी यांना पक्षाने पुन्हा संधी दिल्याने काही नगरसेवकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर नाराजी व्यक्त केली. डम्पिंग ग्राऊंडवरून नाराज कुलकर्णी मधल्या काळात भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या संपर्कात आले होते. यामुळे पक्षाने त्यांना पुन्हा स्थायी समितीवर घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पक्षाला जर अशीच भाषा कळत असेल, तर आम्हालाही प्रभागाच्या विकासासाठी नवा पर्याय शोधावा लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दिव्या गायकवाड यांनी अनेकदा महापालिकेत पक्षाची पडती बाजू सावरली आहे. त्यांच्या अभ्यासू निवेदनातून त्यांनी आरोग्य, उपकर व अर्थसंकल्पात टाकलेला प्रकाशझोत स्वकियांपेक्षा विरोधकांकडून कौतुकाचा विषय ठरला होता; मात्र असे असतानाही पक्षातून वारंवार मिळणारी संशयाची वागणूक मनाला ठेच पोहोचवणारी आहे. अशा परिस्थितीत प्रभागाच्या विकासासाठी नवा पर्याय शोधावा लागेल.
- वैभव गायकवाड, माजी नगरसेवक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही नाराजीचा सूर नाही. पक्षातील कोणताही नगरसेवक नाराज नाही. ज्यांना प्रभाग समित्या मिळाल्या नाहीत, अशांना पुन्हा इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देऊन त्यांची नाराजी दूर केली जाईल.
-अनंत सुतार,  जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Unwilingness in NCP