
UPSC Result : हलाखीच्या परिस्थितीतून काढला मार्ग! गोदीमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या मुलाची रँक 570
- केदार शिंत्रे
मुंबई : सोलापूर स्ट्रीट हा दक्षिण मुंबईतील वाडीबंदर परिसरातील गजबजलेला परिसर. येथे अनेक छोट्या मोठ्या गल्ल्यामध्ये गोडाऊन आहेत. गोडाऊन व्यतिरिक्त या परिसरात झोपड्यांची एक मोठी वस्ती देखील आहे. या वस्त्यांमध्ये बहुतेक रहिवासी मुंबई गोदी आणि या गोडाऊनमध्ये काम करणारे कामगार आहेत.
या वस्तीत कामगारांपैकी एक घर गोदीमध्ये कामगार पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले रमजान सय्यद यांचे आहे. सध्या रमजान सय्यद आणि त्यांचे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे आणि कारण सुद्धा तसे आहे. रमजान सय्यद यांच्या सर्वात लहान मुलाने असलेल्या मोहम्मद हुसेनने नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोग ची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती आहे.
ही परीक्षा देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक मानली जाते. मोहम्मद हुसेन सनदी अधिकारी झाल्याने त्याच्या कुटुंबीयांना त्याच्यावर अभिमान आहे. मोहम्मद हुसेनला या खडतर प्रवासात अनेक आर्थिक अडथळ्यांचा सामना करावा लागला.परंतु विशेष उल्लेखनीय या सर्व अडथल्यातून मार्ग काढत त्याने यश संपादित केले.
जागेची समस्या
मुंबईतील डोंगरी परिसरातील वाडीबंदर झोपडपट्टीत एका छोट्याशा झोपडीत हुसेन आपल्या संपूर्ण परिवारासमोर वास्तव्यास आहे. मोहम्मद हुसेन आजी, आई-वडील, मोठे भाऊ त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत संयुक्त कुटुंबात राहतो. एका झोपडीत 6 सदस्यांचे वास्तव्यास असल्यामुळे अभ्यासासाठी जागेची कमतरता हुसेनला नेहमीच होती. अभ्यास करण्यासाठी जागा शोधणे हे आणखी एक आव्हान होते.
मोहम्मद हुसेन यांनी ज्या छोट्याशा खोलीत अभ्यास केला, त्या खोलीत छतावर डोके आपटल्याशिवाय उभे राहता येत नव्हते. हुसेन अनेकदा घरासमोरील सावलीत किंवा आसपासच्या एखाद्या गोदामात अभ्यास करायला जात असे. घरी अभ्यासासाठी पोषक वातावरण होते परंतु मर्यादित संसाधनांमुळे हुसेनला अडथळ्यांचा सामना करावा लागला. 27 वर्षीय तरुणाने आपल्या जिद्दीने परीक्षेत 570 व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला.
कुटुंबीयांची साथ... वडीलांकडून मार्गदर्शन
मोहम्मद हुसेन सांगतात की वडिलांसोबत अनेक सरकारी कार्यालयांना भेटी दिल्यानंतर त्यांनी सनदी अधिकारी बंनायचा निर्णय घेतला. या पूर्ण प्रवासात त्यांच्या वडीलांची अमुलाग्र भूमिका होती. त्यांच्या प्रोत्साहनामुळे हुसेनला यश संपादित करता आले. हुसेन परीक्षेला जात असताना त्यांचे वडीलही सतत त्यांच्या सोबत असायचे.हुसेनला या प्रवासात कुटुंबाने सुद्धा साथ दिली. घरच्या समस्यांमुळे त्याचे लक्ष विचलित होऊ नये याची कुटुंबीयांनी वेळोवेळी काळजी घेतली.
मोहम्मद हुसेन यांचे कुटुंबीय मुळचे हैदराबाद, तेलंगणा येथील आहेत.गेल्या तीन पिढ्यांपासून मोहम्मद हुसेन यांचे कुटुंब मुंबईत आहेत. मोहम्मद हुसेनचे आजोबा सरकारी सेवेत कार्यरत होते. हुसेन यांच्या वडिलांना शिक्षण पूर्ण नसल्यामुळे सरकारी नोकरी मिळाली नाही. हुसेनच्या वडिलांनी डॉकयार्डमध्ये मजूर म्हणून काम सुरू केले आणि पुढे ते पर्यवेक्षक बनले. त्यांचे भाऊही गोदीत कामाला होते.
अखेरचा संकल्प
डोंगरी येथील सेंट जोसेफ शाळेत मोहम्मद हुसेन यांचे शालेय शिक्षण झाले. साल 2018 मध्ये फोर्ट येथील एल्फिन्स्टन कॉलेजमधून हुसेन यांनी बॅचलर पदवी मिळवली. मोहम्मद हुसेन यांनी यापूर्वी सुद्धा परीक्षा दिली होती परंतु यश मिळाले नाही . चार स्पर्धांमध्ये केवळ प्राथमिक परीक्षा हुसेन उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. चौथ्यादा अपयश आल्याने हुसेनच आत्मविश्वास मोडला होता. अखेर एक शेवटची संधी देण्याचा संकल्प त्यांनी केला आणि जोरदार तयारी सुरू केली. अखेर संकलप प्रत्यक्षात आणत हुसेन स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाला.
सनदी अधिकारी होणार
स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर हुसेन आता करिअरमधील महत्वाच्या टप्प्यावर आहे. मोहम्मद हुसेनकडे भारतीय पोलीस सेवा (IPS) किंवा भारतीय महसूल सेवा (IRS)मध्ये सामील होण्याचा पर्याय आहे. हुसेन सांगतो त्याला देशाच्या विकासासाठी सकारात्मक योगदान द्यायचे आहे. त्याच्या सारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या भल्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणत भर देण्यासाठी काम करायचे असल्याचे हुसेन सांगतो.