उरणमध्ये ६३७ घरात पुराचे पाणी 

सकाळ वृत्‍तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

शहरात पुरस्थिती; मुसळधार पावसामुळे उरणकरांना जागरण

मुंबई : शनिवारी सकाळपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे संपुर्ण तालुक्‍याला झोडपले असून नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. यामध्ये जसखार गावातील २००, चिरनेर २५०, नवघर २०, कुंडे १०, बोकडविरा १५, पाले ५, सावरखार १५, रांजणपाडा २२ तसेच अन्य गावातील जवळपास ७०० घरांमध्ये पाणी शिरले. परिणामी, २६ जुलैसारखी स्थिती निर्माण होण्याच्या भितीने उरणकरांनी रात्रभर जागरण केले. तसेच कोप्रोली गावातील अनेक नागरिकांच्या घरांच्या भिंती कोसळल्याने संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शनिवारपासून सुरु झालेल्या अतिवृष्टीमुळे उरण तालुक्‍यातील अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला असून चिरनेर गावात मोठ्या प्रमाणात पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातील अनेक रहिवाशांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने घरातील सामानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 उरण तहसिलदार कल्पना गोडे यांनी चिरनेर गावातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुरग्रस्तांच्या नूकसानी संदर्भात पंचनामे करण्याचे आदेश तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी यांना दिले आहेत. भेंडखळ, नवघर, जसखार, कुंडे गाव, सोनारी, करळ, जासई, राजणपाडा, कंठवली, विंधणे, केगाव सारख्या इतर गावातील पुर परिस्थितीचा आढावा घेऊन पुरग्रस्तांचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी यांना दिले आहेत. 

संततधार पावसामुळे वशेणी खार, पारांगी खार, तलबंद खार, ओळी भेंडी खार,पिरकोन, पानदिवे, आवरे, सारडे,वशेनी, पुनाडे, आदि गावांसह संपुर्ण तालुक्‍यातील भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  
 
रस्ते गेले पाण्याखाली
चिरनेर-पनवेल रस्ता विंधणे पुलाजवळ पाण्याखाली गेला. तसेच विंधणे- बोरखार, दिघाटी-शेकाची वाडा, वाडा ते मोठी जुई, भोम-चिरनेर तसेच अनेक गावात  जाणारे रस्ते पाण्याखाली गेले होते.
 
शेत जमीनींमध्ये भराव करायला परवानगी देताना पाणी जाण्यासाठी रस्ता सोडलाय कि, नाही याची खात्री ग्रामपंचायत, तहसिल प्रशासनाने केली नाही. प्रशासनाने प्रत्येक भराव केलेल्या मालकांना पाणी जाण्यासाठी जागा सोडायला सांगणे गरजेचे होते. 
राजेश भोईर, नागरिक, मोठी जुई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uranus: 2 flood water in house