
Mumbai : उत्तुंग इमारतींच्या आगीवर आता नियंत्रण; हाय प्रेशर वॉटर मिस्ट प्रणालीचा वापर
मुंबई - मुंबईतील उत्तुंग इमारतीतील लागणाऱ्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी कम्प्रेस्ड एअर फोम सिस्टीमसह (सीएएफएस) हाय प्रेशर वॉटर मिस्ट प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. पालिका ही अध्ययावत ६५ उपकरणे खरेदी केली जात आहेत. या उपकरणाचा आगीच्या उगम पातळीवर अत्यंत प्रभावीपणे वापर करुन आगीचा प्रसार रोखला जाईल, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.
आग लागल्यास व इमारती मधील अंतर्गत अग्निशमन प्रणाली कार्यरत नसल्यास अग्निशमन दलास, पाणी पुरवठा करण्याकरिता पंपांचे जाळे तयार करावे लागते. हे जाळे तयार करण्यास काही वेळ लागतो आणि त्यामुळे आग पसरण्याची व त्यामुळे इमारतीमधील रहिवाशांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.
त्याकरता अग्निशामक जवान आगीच्या वर्दीवर जाताना प्रथमोपचार किट प्रमाणे एक लहानशे व सहजरित्या वाहून नेण्यास सोपे असे अग्निशमन उपकरण स्वतः सोबत घेऊन गेल्यास, तात्काळ आगीवर त्याचा मारा करून उगम पातळीवर आगीवर नियंत्रण मिळविता येऊ शकते, अशी माहिती दलाने दिली.
अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कम्प्रेस्ड एअर फोम सिस्टीमसह (सीएएफएस) हाय प्रेशर वॉटर मिस्ट प्रणाली उपलब्ध असून त्याचा आगीच्या उगम पातळीवर अत्यंत प्रभावीपणे वापर करुन आगीचा प्रसार व इमारतींमधील रहिवाश्यांना निर्माण होणारा धोका टाळता येईल.
हे उपकरण अग्निशामकांच्या पाठीवर सहजरित्या बॅकपॅक प्रमाणे वाहता येते व यामुळे आगीच्या वर्दीला प्रतिसाद देताना सदर प्रणाली अग्निशामक स्वतः सोबत घेऊन जाऊ शकतो. त्याचा क्लास-ए, क्लास-बी तसेच १००० वोल्टस पर्यंतच्या विद्युत आगींवर वापर करता येतो, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
२.५५ कोटींचा खर्च
यासाठी तब्बल २.५५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये ही उपकरणे अग्निशमन दलाच्या ताफ्यात जमा होणार आहे.