धर्माधिकारी यांच्या नावाचा वापर  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

ठाणे - दिव्यात आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने काही पक्ष खोटा प्रचार करत असल्याचा दावा मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी केला.

ठाणे - दिव्यात आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने काही पक्ष खोटा प्रचार करत असल्याचा दावा मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी केला.

दिव्यातील स्थानिक नगरसेवक निवडणुकीच्या काळात आप्पा धर्माधिकारी यांच्या नावाने खोटा प्रचार करत असल्याचा दावा मनसेच्या सभेत अभिजित पानसरे यांनी केला. निवडणुकीच्या काळात बैठकीच्या नावाने राजकारण केले जात असून त्या संदर्भात आपण आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन त्यांना, असे काही आदेश दिले आहेत का? असे विचारले होते. त्यावर आमचे आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम असून राजकारणामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा सहभाग घेत नसल्याचा त्यांनी खुलासा केला आहे, असा दावा पानसरे यांनी केला. 

दिव्यात आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकीला मोठ्या प्रमाणावर अनुयायी येतात. पालिका निवडणुकीच्या दरम्यान बऱ्याच पक्षांकडून आप्पासाहेबांच्या नावाचा वापर केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणामध्येही आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचा उल्लेख होता. त्यांच्या आध्यात्माचा आणि सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना ‘पद्म’ पुरस्काराने गौरवण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले होते. शिवसेनेकडूनही या भागात असाच प्रचार केला जात आहे. मात्र बुधवारच्या मनसेच्या सभेमध्ये अभिजित पानसरे यांनी त्यांच्या नावाचा गैरवापर करून खोटा प्रचार केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे दिव्याच्या राजकारणात आप्पा धर्माधिकारी यांच्या नावाचा वापर सगळेच राजकीय पक्ष करत असल्याची बाब समोर आली आहे. 

मतदारांमध्ये संभ्रम 
एका उमेदवाराचा पैसे मागतानाच्या क्‍लिपचा उल्लेख या वेळी पानसरे यांनी करून ती लवकरच सोशल मीडियावरून पसरवणार असल्याचे सांगितले. मात्र या उमेदवाराची ओळख आणि त्याने कशासाठी पैसे मागितले, याचा उल्लेख केला नाही. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम कायम आहे.

Web Title: using dharmadhikari name