
Mumbai News : ग्रामपंचायत सरपंचाला ठोश्या बुक्क्यांनी केली मारहाण...
डोंबिवली - वाडी ग्रामपंचायतीचे सरपंच तुषार पाटील यांना भाजपच्या कार्यालयात बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जिल्हा परिषद सदस्य आणि भाजप पदाधिकारी श्याम पाटील यांच्या कार्यालयात मारहाण झाल्याने ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे.
सरपंच तुषार पाटील यांच्यासह त्यांचे बंधू बिपीन पाटील व वडील मधुसूदन पाटील यांना देखील मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीसांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास चालू केला आहे.
मलंगवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच निवडीसाठी मिटींग चालु असताना फिर्यादी व आरोपीत यांचे आपापसात मतभेद झाले. या मतभेदाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. यावेळी आरोपी प्रतीक भोलानाथ पाटील, चेतन भोलानाथ पाटील,
विकी भोलानाथ पाटील, शिवाजी पाटील आणि सुनिल चौधरी यांनी शिवीगाळ करत सरपंच तुषार पाटील यांसह त्यांचे बंधू बिपीन पाटील व वडील मधुसूदन पाटील यांना बेदम मारहाण केली. हे प्रकरण अखेर हिललाईन पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी फिर्यादी तुषार यांची तक्रार घेत गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गैरकायदयाची मंडळी जमवुन फिर्यादी यांना शिवीगाळी व दमदाठी करून ठोशा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी यांचे वडिल मधुसुदन पाटील, भाऊ बिपीन पाटील यांना देखील ठोशा बुक्क्यांनी मारहाण केली आहे.
गैरकायदयाची मंडळी जमा करत मारहाण केल्याप्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य आणि भाजप पदाधिकारी श्याम पाटील यांच्या कार्यालयात हा प्रकार घडल्याने याची जोरदार चर्चा सुरू आहे.