वाल्मीकी आवास योजनेमुळे घरांना गती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

पावणे, वारलीपाडा, श्रमिकनगर, आग्रोळी आणि नेरूळ या ठिकाणी घरकुल योजना राबवली होती...

तुर्भे - केंद्र सरकारच्या वाल्मीकी आवास योजनेद्वारे नवी मुंबई महापालिकेने आदिवासींसाठी बांधलेल्या घरकुलांना नवसंजीवनी देण्याचे काम सध्या जोरात सुरू केले आहे. पालिकेने पावणे वारली पाडा येथे वाल्मीकी आवास योजनेअंतर्गत २००५ मध्ये बांधलेल्या घरकुलांना २०१७ चा मुहूर्त सापडला आहे. घरकुले वापराअभावी तब्बल ११ वर्षे पडून राहिल्याने महापालिकेचा लाखोंचा खर्च बुडीत जात होता. पालिका आणि आदिवासींमधील ‘तू तू मैं मैं’मुळे घरकुले पडून होती. आम्हाला चार खोल्यांचे घर द्या, अशी मागणी आदिवासींनी केली होती. पालिकेच्या योजना विभागाने येथील आदिवासींना दोन घरांचा ताबा देण्याचे पत्राद्वारे कळवले होते. तेव्हा ही लहान घरे घेण्यास आदिवासींनी नकार दिला. त्यानंतर दोन घरांची एक सदनिका घेण्यास त्यांनी तयारी दाखवली आहे.

सर्व आदिवासींचे पुनर्वसन करावे. त्यानंतर जुन्या वारलीपाड्यावर कारवाई करावी. तसे झाले नाही तर वारलीपाडा गाव बचाव संघर्ष कृती समिती तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. पालिकेने वाल्मीकी आवास योजनेंतर्गत पावणे, वारलीपाडा, श्रमिकनगर, आग्रोळी आणि नेरूळ या ठिकाणी घरकुल योजना राबवली होती. त्यातील ७० सदनिका पावणे वारलीपाड्याची घरे वापराविना पडून आहेत. श्रमिकनगरमध्ये अनेक लाभार्थींनी आपली घरे विकली आहेत. यापूर्वी पालिकेने पात्र आदिवासीला फक्त एकच सदनिका देण्याचे निश्‍चित केले होते. मात्र, घराच्या कमी आकारामुळे आदिवासींनी एक घर घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर अनेकदा पालिका आणि आदिवासी यांच्यात चर्चा झाली. मात्र, त्यात तोडगा निघत नव्हता. आता आदिवासींनी दोन घरांची एक सदनिका घेण्यास होकार दर्शविला आहे. एकूण ७० सदनिका व २००१ च्या सर्व्हेनुसार १३७ कुटुंबे आहेत. त्यामुळे उर्वरित कुटुंबांचेही पुनर्वसन होणे गरजेचे असल्याचे वारलीपाडा गाव बचाव कृती समितीकडून सांगण्यात आले.

परिसरातील इतर आदिवासींचेही पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी योजना राबविल्या जातील. दोन घरे घेण्यास त्यांचा होकार आल्याने इतर आदिवासींनाही तशीच घरे दिली जातील.
- तृप्ती सांडभोर, पालिका उपायुक्त

Web Title: Valmiki housing scheme