
Vande Bharat : राज्यातील 'वंदे भारत' ट्रेन ठरली पांढरा हत्ती! आठ डबे कमी करण्याची नामुष्की
मुंबई : देशभरातील वंदे भारत ट्रेनच्या क्षमतेपेक्षा कमी म्हणजेच सरासरी ताशी ९०-९५ किलोमीटर वेगाने चालवली जात असल्याने प्रवाशांनी महागडी वंदे भारत ट्रेनकडे पाठ दाखवणे सुरु केले. त्याची प्रचिती महाराष्ट्रात दिसून येत आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते सुरु झालेल्या महाराष्ट्रातील चौथी नागपूर- बिलासपूर वंदे भारत ट्रेनला प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे डब्याची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, आता सोळा डब्याऐवजी आता नागपूर- बिलासपूर वंदे भारत ट्रेन आठ डब्याची चालविण्याचा निर्णय घेतला आहेत.
पंतप्रधानांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील चौथी नागपूर- बिलासपूर वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीने केले होते. ही गाडी छत्तीसगडमधील बिलासपूर आणि महाराष्ट्रातील मुख्य शहर नागपूरला जोडण्याचे काम करत आहे. विशेष म्हणजे बिलासपूर आणि नागपूर ही दोन्ही शहरे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची शहरे आहेत.
या दोन शहरांमधून दररोज मोठ्या संख्येने लोक ये-जा करतात. वंदे भारत ट्रेनमधील एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे २ हजार ४५ रुपये आणि चेअर कारचे भाडे १ हजार ७५ रुपये आहे.नागपूर- बिलासपूर वंदे भारत ट्रेनचा वेग ७८ किमी प्रति तास आहे.
या गाडीचा साडे पाच तास लागतात. इतर मेल- एक्सप्रेस गाडयांना साधरणतः साडे पाच ते सहा तास लागतात. त्यामुळे वेळेची बचत होत नसून पैसे सुद्धा जास्त लागत असल्याने नागपूर- बिलासपूर वंदे भारत ट्रेन पाठ फिरवली आहे. अल्प प्रतिसादामुळे रेल्वेने १६ डब्याऐवजी आता आठ डब्याची वंदे भारत ट्रेन चविण्याचा निर्णय घेतला आहे.
काय म्हणते रेल्वे ?
मध्य रेल्वेचा एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळला सांगितले की. नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसचा रेक सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसच्या रेकसोबत जोडला जात आहे. सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये जास्त प्रवासी आणि प्रतीक्षा यादी आहे. या कारणास्तव, प्रवाशांच्या सोयी आणि सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनसाठी अधिक डब्यांसह रेकची आवश्यकता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहेत.
वंदे भारत ट्रेनचा वेग कागदावरच ?
भारतीय रेल्वेकडून देशभरात वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेल्या आहे. सध्या देशभरात १६ मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावत आहे. या वंदे भारतची ताशी तब्बल १८० किलेमीटर वेगाने धावण्याची क्षमता आहे, ही गाडी वेगाने धावावी म्हणून प्रत्येक दोन डब्यासाठी तब्बल ४५० हॉर्स पॉवरच्या (अश्वशक्ती) इलेक्ट्रिक मोटार लावल्या आहेत. वंदे भारत ट्रेन तांत्रिकदृष्ट्या वेगाने धावण्यास सक्षम असली तरी सध्याचे रेल्वेचे ट्रॅक पाहता ती जास्तीत जास्त ताशी १२० किलोमीटर वेगाने चालवली जात आहे. मात्र गाडीचा सरासरी वेग जास्तीत जास्त ९५ किलोमीटर असल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने दिली.
वंदे भारत ट्रेनचा सरासरी ताशी वेग -
- नवी दिल्ली-वाराणसी - ९६ किमी
- हजरत निजामुद्दीन-राणी कमलापती.- ९५.८९ किमी
- चेन्नई-कोईमतूर- ९०.३६ किमी
- नवी दिल्ली - अम्बा अंदाऊरा- .८५ किमी
- सिकंदराबाद - विशाखापट्टणम.-८४ किमी
- गांधीनगर - मुंबई सेंट्रल - ८३.८७ किमी
- अजमेर - दिल्ली- ८३ किमी
- नवी दिल्ली - श्री माता वैष्णवदेवी कटरा- .८२ किमी
- सिकंदराबाद - तिरूपती - . ७९ किमी
- नागपूर - बिलासपूर- ७८ किमी
- हावडा - न्यू जलपिगुरी- ७६.८४ किमी