वरंध घाटमार्ग खचल्याने भुर्दंड

वरंध घाट ः मुसळधार पावसाने रस्ता खचला आहे.
वरंध घाट ः मुसळधार पावसाने रस्ता खचला आहे.

महाड (बातमीदार) : महाड-पोलादपूरमधील प्रवाशांना सध्या पुणे येथील प्रवास अधिक वेळ व खर्चाचा होऊ लागला आहे. महाड-भोर-पुणे हा मार्ग बंद झाल्याने ताम्हिणी मार्गे पुणे या हाडे खिळखिळी करणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांची ससेहोलपट होत आहे. ताम्हिणी व वाई मार्गे पुण्यात जाण्याकरिता वेळ, पैसा अधिक खर्च होत असल्याने प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.


अतिवृष्टीत महाड-वरंध-पुणे हा रस्ता वरंधजवळ खचल्याने त्याचे काम तीन-चार महिने होणे शक्‍य नाही. महाडपासून पुण्यात जाण्याकरिता महाड-भोर-पुणे हे अंतर अवघे १३२ किलोमीटरचे आहे. महाडजवळून माणगाव मार्गे ताम्हिणी पुणे हाही घाटमार्ग आहे. महाडपासून हे अंतर १५१ किलोमीटर आहे. त्यामुळे एसटी प्रवासासाठी २५ रुपये जादा आकार पडत आहे; परंतु स्वारगेट ते भोर या मार्गावरील विविध ठिकाणी येण्यासाठी पुन्हा जादा खर्च सोसावा लागत आहे.

सध्या या मार्गाची अवस्था बिकट आहे. खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी ताम्हिणी रस्ता खचला गेला आहे. अत्यंत खराब अवस्थेत असलेल्या या मार्गावरून केला जाणारा प्रवास धोकादायक बनला आहे. महाड आगारातून सुटणाऱ्या एसटी बसेस भोर आणि ताम्हिणी या दोन्ही मार्गे जातात; मात्र भोर मार्ग बंद असल्याने एसटीच्या बसेस ताम्हिणी मार्गे सुरू आहेत. महाडमधून पुण्याकडे या मार्गे जाणाऱ्या जवळपास १० एसटी बसेस धावतात. यापैकी दापोली आणि महाड आगाराच्या शिवशाही बसेसचाही समावेश आहे. शिवाय महाड-भोर या चार गाड्याही बंद झाल्या आहेत.

महाड-भोर मार्ग बंद असल्याने एसटीचे आणि इतर प्रवासी ताम्हिणी मार्गाचा नाइलाजाने वापर करत आहेत; मात्र अतिवृष्टीत दोन्ही मार्ग नादुरुस्त झाले असल्याने अनेक प्रवासी आता महाड-महाबळेश्‍वर वाई मार्गे पुण्याकडे जाण्याचा अवलंब करत आहेत. हे अंतरही १९० किमीचे आहे.

महाडमधून पुणे प्रवास एसटीसह सर्वच प्रवाशांना धोकादायक बनला आहे. भोर मार्ग बंद झाल्याने ताम्हिणी मार्गे जाणेही खड्ड्यांमुळे धोकादायक झाले आहे. यामुळे महाबळेश्‍वर-वाई-पुणे जाणे योग्य ठरते; मात्र हा प्रवासही खर्चिक आहे.
- डॉ. शिवाजी पाटील, प्रवासी

एसटी बसेस भोर मार्ग बंद असल्याने ताम्हिणी मार्गे सुरू आहेत; मात्र या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. यामुळे शिवशाही बसेस आणि एसटी बसेसचे नुकसान होत आहे.
- ए. पी. कुलकर्णी, महाड आगारप्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com